विटा : कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी धनंजय चंद्रसेन देशमुख (Dhananjay Deshmukh) व उपनगराध्यक्षपदी विजय वसंतराव गायकवाड (Vijay Gaikwad) हे विजयी झाले. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी गणेश मरकड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप यांनी काम पाहिले.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने १७ पैकी ११ नगरसेवक निवडून आणून घवघवीत यश संपादन केले. देशमुख यांची नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी तर गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी निवडीनंतर जल्लोष मिरवणूक काढण्यात आली. निवडीनंतर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांनी कडेपूर या ठिकाणी जाऊन
स्व.आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कडेगाव या ठिकाणी स्व.सुरेश देशमुख यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतल्यानंतर देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत विजयी मिरवणूक काढण्यात आली.
“कडेगाव हे हिंदू -मुस्लिम धर्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे. इथलं डोलं प्रसिद्ध आहे. कडेगांव शहरात पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चौफर विकास करण्यास कटिबद्ध आहे.”
– धनंजय देशमुख, नूतन नगराध्यक्ष, कडेगांव.