‘भाजपमध्ये प्रवेश करणार्यांच्या मागे ईडी लागत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
भाजप हे असे वॉशिंग मशिन आहे. त्यात कोणतेही कापड टाकले तरी स्वच्छ होऊनच येतात. कारण ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना ईडी (ED), इन्कम टॅक्स (Income Tax) यांची भीती नाही, असेही तांबे म्हणाले.
जामखेड : ‘भाजप हे असे वॉशिंग मशिन आहे. त्यात कोणतेही कापड टाकले तरी स्वच्छ होऊनच येतात. कारण ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांना ईडी (ED), इन्कम टॅक्स (Income Tax) यांची भीती नाही. ते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होऊन बाहेर फिरत आहेत’, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी सांगितले.
जामखेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने जामखेड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निरीक्षक माणिकराव मोरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जामखेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी काळात पक्ष अधिक जोमाने वाढेल
यावेळी युवकचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले यांनी प्रास्ताविक करताना मतदारसंघात पडत्या काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला असून, आपण या कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. गेली 25 वर्षे विरोधात असताना काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. पक्षातील काही नेत्यांनी कधीही पक्ष बदल केला नाही ते निष्ठावंतच राहिले आहेत, आगामी निवडणुकांमध्ये योग्य नियोजन केले तर मोठे यश मिळू शकते. आम्ही नगरपरिषद सर्व जागांची तयारी करतो आहोत, असे जाहीर केले. निष्ठावंतानी पक्षाची मोठी ताकद तालुक्यात उभी केली आहे, त्यामुळे आगामी काळात पक्ष अधिक जोमाने वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
…तर निवडणुकीत मोठे यश मिळेल
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले की, गेली 25 वर्ष तालुक्यातील सत्ता भाजपच्या ताब्यात असताना काँग्रेस पक्ष मजबूत राहिला याचे श्रेय तुम्हा सर्वांना जाते, हा चळवळीचा तालुका आहे. ज्याच्या मागे माणसे आहेत, जो कामासाठी पळपळ करतो, त्याच्यामागे लोक राहत असतात, तीन वर्षांपूर्वी आलो होतो. सर्वांनी जबाबदारी व प्रामाणिकपणे कामे केली तर नक्कीच यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पोलिसांची सखोल चौकशी गरजेची
पत्रकारांशी बोलताना तांबे म्हणाले की, समीर वानखेडे यांच्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, खरेच जर वानखेडे दोषी असतील तर कारवाई गरजेची आहे. काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. त्यामुळे मेळावे सुरू आहेत. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
Web Title: Ed does not follow those who join bjp says congress leader satyajeet tambe nrka