
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रे पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवताना विरोधी पक्ष नेते फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे, हे आमचे काम आहे. सरकार मनमानी कारभार करणार असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही. जनतेच्या आमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्यांची दु:ख आणि प्रश्न मांडणे, हे आमचे काम असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही. विरोधकांसोबत केवळ एकच बैठक घेतली. त्या बैठकीलाही आम्ही सर्व नेते उपस्थित होतो, तर उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर असल्याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून कोरोनाच्या काळात राज्यात सुरु असलेल्या राजकारणाविषयी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली होती. एक वर्षाच्या काळात सरकारने केवळ विकासकामांना स्थगिती दिली, ठोस असे काहीच केले नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सरकारविरोधातील रोष दिसून येईल, असे फडणवीस यांनी म्हटले.