All over the world META service is stopped, accounts in mobiles, laptops are automatically logged out
Facebook Down : आज अचानकच फेसबुकची सेवा बंद झाल्याची पाहायला मिळाली. जगभरात मेटाची सेवा बंद पडली आहे. नेटीझन्सला अचानक फेसबुक लॉगआऊट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाचे सर्व अॅप्लिकेशन्स आणि सोशल मीडिया साईट्स बंद आहेत. सर्वांच्या फोन, लॅपटॉप आणि कम्प्युटरवरील फेसबूक, इन्स्टाग्राम अकाऊंट्स आपोआप लॉगआऊट होत आहेत. त्यानंतर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तरी अॅप्लिकेशन्स सुरू होत नसल्याची तक्रार युजर्स करत आहेत. इन्स्टाग्रामवरील फोटो, व्हिडीओ दिसत नाहीयेत. भारतात रात्री नऊ वाजल्यापासून मेटाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. नेटीझन्स फेसबूक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याची तक्रार करत आहेत. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसह सर्वत्र याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे.
फेसबूकसह इन्स्टाग्राम, मेसेंजर, थ्रेड आणि मेटाचे इतर सर्व प्रकारचे अॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळं बंद आहेत. याबाबत मेटाकडून कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. यापूर्वीदेखील जेव्हा-जेव्हा फेसबूकची सेवा ठप्प झाली होती तेव्हादेखील मेटाने सेवा ठप्प होण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. दरम्यान, Downdetector च्या रिपोर्टनुसार भारतीय वेळेनुसार रात्री ९.१० वाजल्यापासून देशात मेटाची सेवा ठप्प आहे.
दरम्यान, एक्सवर नेटीझन्समध्ये यावर चर्चा चालू आहे. एक्सवर #instagramdown, #whatsappdown, #CyberAttack असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत. या हॅशटॅगसह नेटीझन्स फेसबूक, मेटा हॅक झालं असल्याची भीती व्यक्त करत आहेत. तर काहींना त्यांचा डेटा चोरीला जाण्याची भीती सतावतेय. काही युजर्सना वाटतंय की, भारत सरकारने देशात मेटाच्या सेवा बंद केल्या असाव्यात. कारण अद्याप मेटाच्या सेवा ठप्प असण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. यापूर्वी जेव्हा-जेव्हा मेटा (आधीचं फेसबूक) डाऊन झालं होतं तेव्हा त्या-त्या अॅप्लिकेशनवरील काही फीचर्स बंद असायचे. परंतु, यावेळी मेटाची संपूर्ण सेवा बंद आहे.
फेसबूक डाऊन झाल्याने काही युजर्सना केंब्रिज अॅनालिटिका फेबसूक डेटा लीक प्रकरणाची आठवण झाली. त्यावेळीदेखील युजर्सचे अकाऊंट्स आपोआप लॉग आऊट होत होते. मेटाच्या टीमने काही तासांनंतर मेटाच्या सेवा सुरळीत केल्या. परंतु, काही दिवसांनी फेसबूक डाऊन काळात कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते युजर्सचे अकाऊंट्स आपोआप लॉग आऊट होणं हे मेटाच्या सेवा हॅक झाल्याचं दर्शवत आहेत.