
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत (Sangli District Bank Eletion) मतदारांनी कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. कोणी कोणाला मतदान केले, प्रत्येक तालुक्यात कोणत्या उमेदवाराला किती मते पडली याची माहिती समजणार नाही. मतदारांची गोपनीयता पाळली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. विकास सोसायटी गट सोडून अन्य गटातील उमेदवारांना जिल्ह्यातून मतदान होणार आहे. या गटातील उमेदवारांने प्रत्येक तालुक्यात किती मतदान झाले याची माहिती मजमोजणीत समजणार असल्याचे सांगत काही उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. पतसंस्था, प्रक्रिया, ओद्यागिक, गृहनिर्माण, मजूर, बँका या सहकारी संस्थातील मतदारांची प्रत्येक तालुक्यात मर्यादित संख्या आहे. त्यामुळे तालुक्यातून मतदान उमेदवार निहाय समजल्यास कोणत्या संस्था गटातून कोणाला किती मतदान झाले हे उघड होणार असल्याची भीती निर्माण करून अशा संस्थातील मतदारांवर दबाव टाकला जात आहे.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी निळंकठ करे म्हणाले, गट ‘अ’मध्ये त्या-त्या तालुक्यातील संस्था मतदार मतदान करणार आहे. मात्र, महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी व भटक्यात जाती जमाती या मतदार संघासह गट क १ ते ४ मधील उमेदवारांना पूर्ण जिल्ह्यातील संस्था मतदार मतदान करणार आहेत. मतमोजणीवेळी या गटातील सर्व मतपत्रिका एकत्र करून त्याचे गठ्ठे बांधले जाणार आहे. नंतर ते टेबलनिहाय मोजले जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच मतपत्रीका एकत्र होणार असल्याचे विकास सोसायटी सोडून अन्य गटातील कोणत्याही उमेदवारास कोणत्या तालुक्यातून, कोणत्या संस्था गटातून किती मतदान झाले हे कळणार नाही. जिल्ह्यातीत एकूण मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय वातावरणात मतदान करावे. मतदरांची गोपनीयता शंभर टक्के पाळली जाणार आहे.
मतदान दाखवल्यास मतपत्रिका बाद
निळकंठ करे म्हणाले, मतदान केंद्रात मतदारांची मतदान करताना पुर्ण पणे गोपनियता बाळगली पाहिजे. मतदाराकडून गोपनीयतेचा भंग करत मतपत्रिका केंद्रातील अन्य कोणाला दाखवण्याचा प्रकार झाल्यास ती मतपत्रिका केंद्राध्यक्षांकडे जमा करण्यात येणार आहे. अशी मतपत्रिका मतदान पेटीत टाकली जाणार नाही. हे मत बाद करण्यात येणार आहे. गोपनियमात भंग होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात व्हिडिओ कॅमेरे लावण्यात येणार आहेत.