देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 11 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनन रुग्णांचा पॅाझिटिव्हीटी रेट 5.01% झाला आहे.
संसर्गाचे प्रमाण 28 टक्क्यांच्या आसपास दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 वर्षात येथे 1527 नवीन रुग्ण आढळले आहेत. सकारात्मकता दर देखील 27.77% वर होता. म्हणजेच, प्रत्येक 100 रुग्णांपैकी सुमारे 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या 24 वर्षात राजधानीत कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 909 रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 3962 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1086 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या 24 तासात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 5700 वर गेली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक २७४ रुग्ण आढळले आहेत, मात्र या काळात एकाचाही मृत्यूची नोंद झाली नसून गेल्या 24 तासांत 274 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत 1,635 सक्रिय रुग्ण आहेत.
भारतात आढळलेल्या कोरोना प्रकरणांमध्ये, बहुतेक प्रकरणे नवीन प्रकार XBB.1.16 चे आढळून येत आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगचे निरीक्षण करणार्या INSACOG च्या मते, देशातील दैनंदिन कोरोना प्रकरणांपैकी 38.2% प्रकरणे XBB.1.16 प्रकारातील आहेत. XBB प्रकार काय आहे? XBB.1.16 हा Omicron चा एक प्रकार आहे, जो कोरोनाचा उप-प्रकार आहे. तज्ञांच्या मते, XBB.1.16 XBB.1.5 पेक्षा 140 टक्के वेगाने पसरू शकतो. हे XBB.1.5 पेक्षा जास्त आक्रमक आहे आणि XBB.1.9 व्हेरियंटपेक्षा कदाचित वेगवान आहे. मात्र, कोरोनाच्या नवीन प्रकाराची लक्षणे पूर्वीसारखीच आहेत. कोणतीही नवीन लक्षणे समोर आलेली नाहीत. बदलत्या हवामानामुळे फ्लूचे रुग्णही वाढले आहेत, अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत.