bharat band
ठाणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या(agricultural law) विरोधात राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यानिमित्ताने आज शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘भारत बंद’ ची(bharat band) हाक देण्यात आली होती. या बंदला राज्यसह ठाण्यात(thane) संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. ठाण्यात सकाळपासून अनेक ठिकाणी तुरळक गर्दी पाहायला मिळाली. एस.टी. स्टॅंण्ड, बाजारपेठ या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर महामार्गावर तुरळक गाड्या पाहायला मिळाल्या.
शेतकरी विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आलीय. ठाण्यामध्ये भारत बंदला संमिश्र असा प्रतिसाद दिसून आलाय. तर सकाळपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. ठाण्यातील रेल्वेस्थानक परिसरात दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी या मुख्य ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तर सार्वजनिक वाहतूक तुरळक पण सुरळीत सुरू होती.
ठाण्यातील रस्त्यावर नेहमीपेक्षा आज गर्दी कमी दिसली. रेल्वे, बस आणि खाजगी गाड्यांमधील प्रवासी संख्या सकाळी कमी होती. ठाणे रेल्वे स्थानक, ठाणे एस टी बस डेपो तसेच ठाण्याहून खाजगी बसेसने मुंबईला जाणारे चाकरमानी आज कमी संख्येने बाहेर पडले होते. त्यामुळे या ठिकाणांवर आज चाकरमान्यांची कमी वर्दळ पहायला मिळाली.
वंचित आघाडीने केला ठाणे बंदचा प्रयत्न
भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठाण्यात जोरदार आंदोलन करून ठाणे बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठाणे शहरात राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथे आंदोलन केले. मोदी-शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलकांनी स्टेशन परिसरातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. या आंदोलनात वैभव जानराव, गुलाब ठोके, संभाजी काचोळे, गोपाल विश्वकर्मा, जितेंद्र आडबल्ले, किसन पाईकराव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वर्तक, शास्री नगरात कडकडीत बंद
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर रिपाइं एकतावादीच्या वतीने केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शास्री नगर, वर्तक नगर, परेरा नगर आदी भागात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. कृषि कायद्याच्या विरोधात गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला बसले आहेत. या शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला रिपाइं एकतावादीने पाठिंबा जाहीर केला होता. रिपाइ एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी नागरिकांना शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शास्री नगर, वर्तक नगर, परेरा नगर, लोकमान्य नगर आदी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागात केवळ मेडिकल आणि दवाखाने उघडी ठेवण्यात आली होती. या संदर्भात युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले की, आजचा बंद हा प्रातिनिधिक होता. पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर राज्यभर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल.
[read_also content=”शिर्डीतील मंदिराच्या ‘त्या’ वादात आता विखे पाटलांनी घेतली उडी, म्हणाले ‘माझा ग्रामस्थांना पाठिंबा’ https://www.navarashtra.com/latest-news/mla-vikhe-patil-supported-shirdi-villagers-for-dress-code-board-sr-61911.html”]