वाई : जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि त्यामुळे राज्यातील अनेक भागातील गावांमध्ये डोंगरकडे ढासळून असंख्य घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यात माणसं जनावरे मृत्युमुखी पडल्याने कधीच न भरुन येणारे नुकसान झाले आहे. यातून नुकसानग्रस्त नागरिकांना नव्याने उभे करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांना आणि मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करत आहे.
कोरोनो काळात राज्यासमोर अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने सध्या राज्याची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी व पूरग्रस्तांना वेळेत मदत पोहोच व्हावी, ही भावना लक्षात घेऊन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने मुंबई शहरातील सहकारी संस्थेच्या वतीने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीला मदत म्हणून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ १ कोटी पन्नास लाखांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते सुपूर्त केला, अशी माहिती संचालक जिजाबा पवार यांनी दिली.
हा निधी संकलित करण्यासाठी बँकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक सिद्धार्थ कांबळे, नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक सर्वश्री अभिजित अडसूळ, विठ्ठलराव भोसले, भाऊसाहेब पार्ले, अभिषेक घोसाळकर, अनिल गजरे, आनंदराव गोळे, विनोद बोरसे, संचालिका जयश्री पांचाळ, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख व कार्यकारी संचालक डी. एस. कदम यावेळी उपस्थित होते.