मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल आयोगासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) सोमवारी हजर होणार असल्याची माहिती परमबीर यांच्या वकिलांकडून आयोगाला शुक्रवारी (दि.26) देण्यात आली.
परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. उच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, परमबीर सिंह यांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगा, अन्यथा पोलिसांना त्याच्यांविरोधात जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील, असे आयोगाने बजावले होते.
तसेच परमबीर सिंह कुठे आहेत अशी विचारणा आयोगाने केली होती. त्यावर शुक्रवारी परमबीर यांच्यावतीने बाजू मांडताना, परमबीर एका खटल्यासंदर्भात दंडाधिकारी न्यायालयात आहेत. तसे असले तरीही ते शनिवारी आयोगासमोर हजर राहण्यास तयार असल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली. मात्र, शनिवारी आयोग बसत नसल्याने परमबीर यांना सोमवारी आयगोसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.
फरार प्रकरणी पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी
परमबीर सिंह यांनी फरार गुन्हेगार घोषित करण्याच्या आदेशाविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर मुंबई पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दंडाधिकारी एस. बी. भाजीपाले यांनी मागील आठवड्यात सिंह यांना गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या एका प्रकरणात फरार गुन्हेगार घोषित केले आहे. शुक्रवारी सिंह यांनी हा आदेश रद्दबातल करण्याच्या आणि न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला संरक्षण दिले असल्याच्या पार्श्वभूमीवर फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्याला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशमुखांना मंगळवारी आयोगासमोर हजर करणार
परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर हजर केले जाणार आहे. आयोगातील एका अधिकाऱ्याने विशेष सत्र न्यायालयात त्यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने अनिल देशमुख यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता आयगोसमोर हजर करावे, चौकशीअंती त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.