
राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवास लाभलेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. या महोत्सवात सुमारे आठ लाख पुस्तकप्रतींची विक्री झाली; सुमारे अकरा कोटींची उलाढाल झाली. पुस्तके वाचली जात नाहीत असा सार्वत्रिक निराशेचा सूर असतानाही विक्री वाचन संस्कृतीबद्दल आशा निर्माण करणारा आहे यात शंका नाही. असेच पुस्तक महोत्सव देशात अनेक ठिकाणी होत असतात आणि त्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळतो. मात्र, पुस्तके वाचली जाणे म्हणजेच वाचन संस्कृती रुजली असा निष्कर्ष काढणे घाईचे होईल. याचे कारण वाचन संस्कृती रुजल्याचा मापदंड म्हणून पुस्तकांच्या विक्रीच्या आकड्यांचे दाखले दिले जाऊ शकतात आणि त्यातून फसवे चित्र उभे राहू शकते.
भारतात पुस्तकांची विक्री ही जगभरात सर्वाधिक आहे. एका आकडेवारीनुसार, देशातील २६.४ टक्के लोक पुस्तके वाचतात. म्हणजेच दर चार जणांमागे एक जण वाचणारा आहे. या वाचणाऱ्या वर्गातील ४१ टक्के लोक २५ ते ३४ वर्षे या वयोगटातील आहेत आणि सुमारे २९ टक्के लोक १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत. भारतात पुस्तके वाचली जात आहेत हे अधोरेखित करण्यासाठी ही आकडेवारी बोलकी आहे. या पुस्तकांमध्ये कथा-कादंबऱ्यांचे प्रमाण किती, चरित्रे-आत्मचरित्रे यांचे प्रमाण किती इत्यादींची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अर्थात प्रकाशक एवढ्या मोठ्या प्रमाणावर छापील स्वरूपात पुस्तके प्रकाशित करीत आहेत याचा एक अर्थ त्यांना बाजारपेठ आहे हे आहेच; पण वाचन सहभाग आणि वाचन संस्कृती यात असणारी सीमारेषा धूसर पण तितकीच महत्वाची आहे. वाचन संस्कृती याचा विचार करण्यापूर्वी संस्कृती या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर मग देशात वाचन संस्कृती रुजली आहे का, याचा तपास करता येईल. तशी ती नसेल तर ती रुजावी म्हणून उपाययोजना ठरविता येतील. संस्कृतीचा अर्थ वागण्या-बोलण्याची पद्धत अशी एक व्याख्या पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात सांगितली होती. याचाच अर्थ संस्कृतीत स्वाभाविकता हे व्यवच्छेदक लक्षण असते. व्यक्तीपासून समाजापर्यंत त्याची लक्षणे ठळकपणे आढळतात. त्यांत वय, लिंग हे निकष तितकेसे महत्वाचे नसतात; तर त्यांत एका प्रकारचे सार्वत्रिकीकरण असते. एखाद्या समाजाची किंवा समूहगटाची संस्कृती असे म्हटले जाते तेव्हा त्यांच्यात वागण्या-बोलण्याच्या-राहण्याच्या पद्धतीत एक समान सूत्र आढळते. देशात आणि महाराष्ट्रात वाचनाबद्दल असे समानसूत्र आणि स्वाभाविकता आढळते का हे पाहावयास हवे.
पुस्तकांचा खप हा त्यांतील एक निकष झाला. त्याबाबतीत उत्साहवर्धक स्थिती आहे हे खरे. पण समाज म्हणून वाचनाकडे कसे पाहिले जाते हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. पुरातनकाळी ज्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत असणे अपेक्षित होते त्या कलांमध्ये पुस्तक वाचन याचा समावेश आहे. तेव्हा वाचनाबद्दल भारतीय संस्कृतीत केलेला विचार प्राचीन आहे हे उघड आहे. पुस्तके याचा अर्थ केवळ छापील स्वरूपात असा अर्थ नाही. छपाईचे तंत्रज्ञान जोहान्स गुटेनबर्गने पंधराव्या शतकात जर्मनीत पहिल्यांदा प्रस्थापित केले. त्यापूर्वीपासून भूर्जपत्रे किंवा तत्सम स्वरूपात लेखन होत होतेच. तक्षशिला आणि नालंदा ही प्राचीन विद्यापीठे, त्यात असणाऱ्या ग्रंथांच्या प्रचंड संग्रहासाठी प्रसिद्ध होती. असे म्हणतात की आक्रमकांनी नालंदावर हल्ला केला आणि ग्रंथांच्या इमारतीला आगीच्या भक्ष्यस्थानी पाडले. ग्रंथ-हस्तलिखिते यांची संख्या इतकी मोठी होती की ती आग अनेक दिवस धुमसत होती. प्रश्न आक्रमकांना पुस्तकांना आग लावावीशी का वाटली हा आहे. पुस्तके ज्ञानाचे स्रोत आहेत हे त्याचे कारण. पुस्तकांचे वाचन ज्ञान देतात; सर्जनशीलता निर्माण करतात, वाचकाला समृद्ध करतात; भविष्याकडे पाहण्याची ऊर्मीही निर्माण करतात.
हे जेव्हा समाजात सार्वत्रिक होते तेव्हा त्याला वाचन संस्कृती रुजली असे म्हणता येईल. वाचन हा सामान्यतः व्यक्तिगत अनुभव असला तरी सामाजिक-सार्वजनिक असा आयाम त्याला लाभतो तेव्हा वाचन संस्कृती रुजली असे म्हणता येईल. जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक-वाचनाची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज आहे असे मानतो, तो ‘वाचन-संस्कृती’ असलेला समाज म्हणून ओळखला जातो,’ अशी व्याख्या प्रा. वेंडी ग्रिसवोल्ड यांनी केली आहे. तर नेब्रास्का -लिंकन विद्यापीठाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका निबंधात असे म्हटले आहे की माहिती, शहाणपण आणि मनोरंजन याविषयीच्या अनुभवांचे समृद्धपण लिखित शब्दांतून मिळविणे म्हणजे वाचन संस्कृती. भारतात-महाराष्ट्रात पुस्तकांची विक्री होत आहे हा एवढा एकच निकष म्हणूनच वाचन संस्कृती रुजली असे ठरविण्यास पुरेसा नाही. त्याचा अन्य काही अंगातून विचार करावयास हवा.
अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन किती जण पुस्तके वाचतात; अध्ययनाचा टप्पा संपल्यानंतर देखील कितीजण सवय म्हणून वाचतात; वाचनासाठी लहानपणापासून संस्कार व्हावेत यासाठी पोषक वातावरण आहे का; एकूण वाचन-व्यवहाराकडे समाज कोणत्या दृष्टीने पाहतो हे निकष या दृष्टीने महत्वाचे. या सगळ्यातून विचार केला तर वाचन संस्कृती रुजण्याच्या मैलाच्या दगडापासून आपण अजून दूर आहोत असे दिसते. म्हणूनच त्यासाठी उपाय योजायला हवेत. शालेय जीवनापासून वाचनाचे महत्व अधोरेखित करायचे तर मुदलात शिक्षकांना वाचनाची गोडी असायला हवी; त्यांच्यात प्रयोगशीलता असायला हवी. इंग्लंडमध्ये शाळांमध्ये दर आठवड्याला एक दिवस वाचन-दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुस्तक कोपरे शाळांमध्ये विकसित केलेले असतात आणि तेथे मुलांना आकृष्ट करतील अशा पद्धतीने पुस्तके निवडलेली, रचलेली असतात. शांतपणे बसून पुस्तक वाचण्यात रममाण होण्याची सवय तिथे लागण्याची शक्यता अधिक असते. एकदा तरुण वय आल्यानंतर वाचन हे वैयक्तिक आवड़ीवर अवलंबून होते. पण ती चळवळ व्हायची तर शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. मुलांना वाचनाची गोडी लागायची तर त्यांच्या भावविश्वाचा विचार करून लेखन करणारे कसदार लेखक हवेत. अशा लेखकांची विद्यार्थ्यांशी अधूनमधून थेट भेट घडवून आणली तर विद्यार्थ्यांचे वाचक होण्याचा संभव वाढतो. शाळा शाळांमध्ये ग्रंथालये हवीत; तद्वत सार्वजनिक ग्रंथालये देखील हवीत आणि त्यांची स्थिती उत्तम असायला हवी. आणि तेथे विद्यार्थ्यांना मुक्तप्रवेश हवा. ग्रंथपालांचे काम ग्रंथांचे जतन हे आहे तद्वत तेथे येणाऱ्यांना वाचनास पोषक वातावरण ठेवणे हेही आहे. त्यासाठी ग्रंथपालाने विद्यार्थ्यांना आवर्जून नवनवीन पुस्तके सुचविली पाहिजेत.
एखादे पुस्तकांचे गाव किंवा पुस्तकांचा बगीचा हे प्रयोग उल्लेखनीय आहेतच हे नाकारता येणार नाही. मात्र, म्हणून सार्वजनिक वाचनालयांना ते पर्याय असू शकत नाहीत. सार्वजनिक वाचनालये प्रगत देशांत दिमाखाने उभी असतात. देश श्रीमंत आहेत म्हणून तेथे सुसज्ज ग्रंथालये आहेत असे मानण्याचे कारण नाही. संस्कृती पुस्तकांच्या आधारे उभी राहिली आहे, या दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती म्हणूनच तपासून पाहायला हवी. तेथे कोणत्या स्वरूपाची पुस्तके आहेत; तेथे संदर्भ ग्रंथ किती प्रमाणात आहेत; त्यांची देखभाल ही केवळ उपचार म्हणून केली जाते की कर्मचारी आस्थेने ती करतात हेही पाहणे महत्वाचे. वाचन संस्कृती रुजण्यात सार्वजनिक वाचनालयांचे योगदान अनन्यसाधारण ठरू शकते. सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती दयनीय असेल तर तिकडे कोणी फिरकणार नाही. तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपण एक संस्कृती रुजविण्याची जबाबदारी घेतली आहे याचे भान ठेवावयास हवे. अनेकदा वाचकांना दुर्मिळ ग्रंथ हवे असतात; मात्र ग्रंथालयातील कर्मचारी त्या ग्रंथांना हातही लावण्यास परवानगी देणार नसतील तर त्याने त्या वाचकांच्याच मनात नव्हे तर एकूणच समाज म्हणून ग्रंथालयांबद्दल एक अढी निर्माण होऊ शकते. ग्रंथालयांना निधी लागतो; त्याची तजवीज मात्र शासनाने करावयास हवी. ग्रंथालयांना शासन प्राधान्य देते का यावरही वाचन संस्कृती रुजणे किती शक्य याची चाचपणी करता येते. साहित्य संमेलने गावोगावी व्हायला लागली आहेत; त्यात लेखक-वाचक भेटी; वाचक मेळावे यांचा समावेश व्हायला हवा. पुस्तकांची प्रदर्शने आयोजित होतात; त्यात पुस्तकांची विक्रीही होते. पण वाचन संस्कृती रुजण्यासाठी शासनापलीकडे जाऊन या संस्थानी वर्षभर सातत्याने उपक्रम राबविले पाहिजेत. त्यात विद्यार्थ्यांपासून प्रौढ वाचकांपर्यंत सर्वांना सामावून घ्यायला हवे. लेखक-वाचक संवाद, वाचकांचे परिसंवाद, नव्या पुस्तकांची चर्चा; दुर्मिळ पुस्तकांचे जतन आणि त्याबरोबरच त्यांची उपलब्धता हे सगळे झाले तर वाचन संस्कृती रुजण्यास चालना मिळेल. प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश इत्यादींनी निवृत्तीनंतर शासकीय पदांच्या मागे लागण्याऐवजी आपल्या क्षेत्राशी निगडित अभ्यास- संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्यावर आधारित ग्रंथ निर्मिती करायला हवी. प्रगत राष्ट्रांत हे सर्रास होते. अशाने पुस्तकांना आणि पर्यायाने वाचनाला लाभणारी प्रतिष्ठा महत्वाची.
वाचण्याखेरीज पर्याय नाही; तेव्हाच नव्हे तर नाही वाचले तरी चालेल अशी स्थिती असूनही जेव्हा माणसे वाचत राहतात तेव्हा वाचन संस्कृती रुजली असे मानावयास हरकत नाही. कारण त्यात स्वाभाविक सहजता असते. वाचनासाठी माध्यम छापील आहे की, इलेक्ट्रॉनिक हा मुद्दा दुय्यम. कळीचा मुद्दा नव्या वर्षात या दृष्टीने वैयक्तिक ते शासकीय अशा सर्व स्तरांवर उपक्रम राबविणे श्रेयस्कर हा. ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असे समर्थांनी म्हटले आहे. हा जेव्हा समाजाचा स्थायीभाव होईल तेव्हा वाचन संस्कृती रुजेल.
– राहुल गोखले