थिएटरपेक्षा भली मोठी उंच कटआऊटस हे दक्षिणेकडील भन्नाट कल्चर आपल्याकडे तसं नवीन नाही तर साठच्या दशकापासूनच आहे हे सांगितल्याने तुम्ही नक्कीच सुखावाल. मल्टिप्लेक्स युगात ते काहीसं हरवलं होतं. रजनीकांतचा पिक्चर आला रे आला की सायन, माटुंगा परिसरातील सिंगल स्क्रीन थिएटर (विशेषत: अरोरा) आणि मल्टिप्लेक्सवर ते दिसे. शुक्रवारी भल्या पहाटे फर्स्ट शोलाच चाहत्यांकडून या कटआऊटसने आंघोळ घालून आनंद साजरा होई.
पुष्पा, आरआरआर, केजीएफ, कांतारा दक्षिणेकडील या चित्रपटांनी ‘भव्य दिमाखदार थिएटर डेकोरेशन कल्चर’ छान स्थिरावलं. ‘ॲनिमल’च्या खणखणीत यशाने हे डेकोरेशन आता जणू आवश्यक झालय. शाहरुख खानच्या राजकुमार हीरानी दिग्दर्शित ‘डंकी’चा शाहरुख खानही असाच मल्टिप्लेक्स उंचीच्या कटआऊटसने लक्ष वेधून घेतोय. अशी भली मोठी कटआऊटस लावून नव्हे, थीममध्ये धमक (अथवा दम) असेल तरच पिक्चर चालतोच असंही कोणी यावरुन वाटलं.
हिंदी चित्रपटासाठी अशी भली मोठी उत्तुंग कटआऊटस पूर्वीही लागत. ती पाहायला गर्दीही होई. त्यावरुन पिक्चरबदद्दल उत्सुकता वाढे. अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची रचना भव्य डेकोरेशन आणि आकर्षक कटआऊटस यांना भारी स्कोप देणारी. फरक इतकाच की, त्या काळातील कटआऊटस थिएटर्सपेक्षाही उंच नसत. खास करुन दक्षिण मुंबईतील अशा थिएटर्सच्या फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला न्यायलाच हवे. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमाला श्रीकृष्ण लीला, बलराम श्रीकृष्ण अशा पौराणिक चित्रपटासाठी कटआऊटस अशी नि इतकी डेकोरेटीव्ह की त्यांनाही भक्तीभावाने हात जोडावेसे वाटे. राॅक्सी आणि राजेश खन्ना हे एकदमच हिट- फिट्ट समीकरण. आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, रेड रोझ या फिल्मचे डेकोरेशन पाहण्यातही एक वेगळीच मौज असे. ऑपेरा हाऊस तर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत फुल्ल डेकोरेशन आणि मधोमध एक कटआऊटस. ‘अमर- अकबर- ॲन्थनी’च्या वेळेस मधोमध अमिताभचे ॲन्थनी गोन्सालवीसचं रुपडं. लक्षात राहिलीत अशी कटआऊटस हो. पिक्चर फक्त पडद्यावर दिसतो असे नाही. तो असावी अनेक माध्यमातून दिसत असतो. इंपिरियलवरही असाच फंडा. ‘दुनिया का मेला’मधील रेखाच्या क्लब डान्सचा देखावा, ‘अंधा कानून’चा अमिताभ हे पलिकडच्या फूटपाथवर जाऊन बघण्याचा मोह होणारच. नाझवरचा ‘यादो की बारात’चा चाकूधारी धर्मेंद्र जणू त्याची मॅनची इमेज बळकट करणारा. पिक्चरने पन्नास आठवड्यांचा मुक्काम करताना सतत हा ‘सूडनायक’ धर्मेंद्र डोळ्यासमोर राहिला. ऊन, पाऊस, थंडीत हे कटआऊटस तसेच उभे राहत. मिनर्व्हावरचे डेकोरेशन हा एक स्वतंत्र रंजक विषय. ‘शोले’च्या गब्बरसिंगने ठाकूरला ताकदीने पकडलयं, ‘शान’चा डेंजरस शाकाल, ‘राम तेरी गंगा मैली’ची धबधब्याखालील ओलेती गंगा ही कटआऊटस गाजली. मराठा मंदिर चित्रपटगृहावरचे ‘मुगल ए आझम’चे डेकोरेशन पहायलाही सतत गर्दी होई. पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत चालतोय, आपण नंतर बघुच तोपर्यंत हे कटआऊटस मनात घर करुन घे अशी ती भावना असे. एखाद्या महान कलाकृतीच्या मेकिंगचा प्रवास असा रसिकांच्या प्रतिसादातून पुढे सुरु असतो. त्याच्या आठवणीच्या रुपाने तो पुढे कायम राहतो. ‘रझिया सुल्तान’च्या फ्लाॅपची कायमच चर्चा रंगते. पण मराठा मंदिरवरचा गरुडाचा कटआऊटस पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा. अपयशी चित्रपटही कोरा कागद नसतो. त्याचही काही तरी वैशिष्ट्य असतेच. अलंकार थिएटरवरचा झुंबराला लटकलेल्या ‘जुगनू’चा कटआऊटस एकीकडे खेतवाडीकडून तर दुसरीकडेच भेंडी बाजारकडून लक्ष वेधून घेई.
आठवणीच्या फेरफटक्यातील ही काही उदाहरणे. चित्रपटाच्या इतिहासात थिएटर डेकोरेशन, कटआऊटस यांचे स्थान खूपच महत्वाचे. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे. मल्टिप्लेक्स युगात ते हरवले. सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत बंद होताना हा सगळा आठवणीतील ठेवा झाला. मात्र दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने ती वेधक परंपरा जपली. थिएटर्स झालेच, लहान मोठ्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी आपल्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची नि स्टार्सची कटआऊटस लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरताहेत. आपला चित्रपट आणि आपले स्टार आपणच मोठे करायला हवेत अशी तेथील चित्रपटसृष्टीची भावना आहे आणि याच डेकोरेशन, कटआऊटस कल्चरला आपणच दाद द्यायला हवी असा चित्रपटवेड्यांचा दृष्टिकोन आहे. साऊथचे हे कल्चर आता हिंदीत जम बसवतेय तरी ते मूळ हिंदीचेच. चित्रपटाचा इतिहास असा घडत असतो…
– दिलीप ठाकूर