मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातून दररोज बलात्काराची प्रकरणे समोर येत आहेत. पश्चिम बंगाल, बदलापूर, नाशिक, अकोला, पुणे, जळगाव, अशी एक ना अनेक ठिकाणी बलात्काराच्या प्रकरणांनी संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणांवरून दैनिक ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
‘बदलापुरातील लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण अस्वस्थ करणारे आहे. याप्रकरणी भाजपचे महिला मंडळही शांतच आहे. गृहमंत्री फडणवीस सारवासारवी करीत आहेत. का? कोणासाठी?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तर, कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डाक्टरवर बलात्कार व नंतर हत्या झाली. त्याचे पडसाद देशभरात उमटले. या घटनेचे निमित्त करून प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचे सुरू असलेले प्रयत्न स्पष्ट दिसतात,’ अशी टीकाही केंद्रातील भाजप सरकारवर करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा: हर्षवर्धन पाटील वेगळा मार्ग निवडणार?; इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग
‘जिथे जिथे `भाजप’ची सरकारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांवरील अत्याचार, बलात्काराची प्रकरणे किळसवाण्या पद्धतीने समोर आली व त्यावर भाजपने आणि त्यांच्या महिला मोर्चाने कधीच तोंड उघडले नाही. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशात उमटावेत यामागे भाजपची यंत्रणा पद्धतशीर काम करीत असते, पण महाराष्ट्रातील बदलापूर, उरण, उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नावसारख्या प्रकरणांवर भाजप व त्यांचे नेतृत्व गप्प बसते.’ अशी घणाघाती टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
“कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचारांबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलने केली, पण मोदी व त्यांच्या सरकारने काहीच कारवाई केली नाही. जणू बलात्काराला मोदींच्या सरकारने राजमान्यताच बहाल केली,’ यावरून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारची पोलखोल केली आहे. त्याशिवाय, “बदलापुरातील दोन लहान मुलींवर शाळेतच अत्याचार झाले. शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या हुकुमाने अत्याचार झाले असा होत नाही. पण ही संस्था काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असती तर एव्हाना देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महिला मंडळाने बदलापुरात जाऊन शाळेच्या पायरीवर फतकल मारली असती, पण आज ते बलात्कारावर वेगळेच प्रवचन झाडत असल्याची टीकाही रोखठोकमधून केली आहे.
हेदेखील वाचा: घरगुती उपाय करून गुडघे दुखीपासून मिळवा सुटका, ७० व्या वर्षीसुद्धा हाडं राहतील मजबूत