भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. (फोटो - सोशल मीडिया)
मुंंबई : बदलापूरमध्ये लहान चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे वातावरण तापले आहे. शाळेमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे पालकांनी आवाज उठवला आहे. बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झाल्यानंतर आता या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असून राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नसल्याचे देखील म्हटले जात आहे. विरोधकांनी टीकांची झोड उठवली असून आरोप केले जात आहे. बदलापूर अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद असा आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीने घेतल्यामुळे महायुतीने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी महाविकास आघाडीची मानसिकता असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले,”उद्धवजी कशाला दिशाभूल करता?, तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता. पण आश्चर्य आहे, तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता त्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात कित्ती भयंकर घडले होते. तेही कारनामे जरा आठवा, जनतेला ऐकवा. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. जनतेला कळू द्या. आपले झाकून ठेवून कित्ती दिवस जनतेची दिशाभूल करणार,” असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
उद्धवजी कशाला दिशाभूल करता?
* तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले!
“आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट,” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता.
पण आश्चर्य आहे, तुम्ही…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 22, 2024
‘उठता बसता’ राजकारण करता
पुढे त्यांनी काही घटनांची आठवण करुन देत सांगितले की, “22 ऑगस्ट 2013 रोजी, म्हणजे 11 वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तेव्हा सरकार काँग्रेस -राष्ट्रवादीचे होते. हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला. पेट्रोल टाकून जाळले होते तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते. डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. 33 आरोपींची नावं समोर आली होती. तेव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते. मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते. या सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपीना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुढाकार घेतो. पण तुम्ही ‘उठता बसता’ राजकारण करता. उद्धवजी, हे निषेधार्ह आहे. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे,” अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.