
पुणे : हडपसर भागात दुकानदार आणि टोइंग व्हॅनच्या कामगारांत झालेल्या हाणामारीचे पडसाद पोलीस दलात चांगलेच उमटले आहेत. पोलीस आयुक्तालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना बोलवत याबाबत विचारपूस करत धारेवर धरले. त्यामुळे आयुक्तालयाचे वातावरण गरमागरम झाले होते. यादरम्यान, टोईंग व्हॅनच्या ठेकेदारांना देखील वाहतूक शाखेकडून कडक भाषेत समज देत चारही कामगारांचे काम बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाहतूक शाखा चर्चेत आली आहे.
शहरात नियम मोडून तसेच नो-पार्किंगमधील वाहने वाहतूक शाखेकडून त्यावर कारवाई केली जाते. दुचाकी दिसता टोईंग व्हॅनमधून लागलीच त्या उचलून नेण्यात येतात. तर, चारचाकींना कधी जामर तर कधी उचलबांगडी केली केली जाते. शहरात वाहतूक शाखेचे २७ विभाग आहेत. या विभागात वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन व क्रेन आहेत. शहरात एकूण १९ टोईंग व्हॅन तसेच १९ क्रेन आहेत. क्रेनने चारचाकी उचलल्या जातात. तर, टोईंग व्हॅनमधून दुचाकींची उचला-उचल होते. विदर्भ इन्फो टेक कंपनीला टोईंग व्हॅनचे कंत्राट देण्यात आलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कंत्राट असून, त्याद्वारे वाहने उचलली जात आहेत. दरम्यान, एका गाडीवर एक पोलीस कर्मचारी आणि तीन ते चार मुले वाहने उचलण्यासाठी कत्रांटदाराकडून नेमलेले असतात. शहरात शंभरहून अधिक कामगार सध्या वाहतूक पोलिसांसोबत वाहने उचलण्याचे काम करतात.
परंतु, टोइंग व्हॅनच्या कामगारांकडून वाहन चालकांशी मुजोरीचे वर्तन होतं हे पुणेकरांचा अनुभव आहे. हडपसर भागात दुकानदारास या कामगारांनी मारहाण केल्याची घटना घडली. तो व्हिडीओ देखील व्हायरल झाला. उद्धट बोलल्यानंतर दुकानदाराने कामगारावर विट उगारली होती. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली.
या संपूर्ण घटनेची अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल वाहतूक शाखेच्या वरिष्ठांना लागलीच आयुक्तालयात पाचारण केले. तसेच, त्यांच्याकडे घटनेची चौकशी केली. त्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यांनाही बोलविण्यात आले. त्यांच्याकडेही विचारपूस केली गेली. या वेळी अतिवरिष्ठांनी धारेवर धरत पुणेकरांशी वागताना अन् बोलातना संयम बाळगा व सौजनाने वागा असे स्पष्ट सांगण्यात आले. यानंतर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित टोइंग व्हॅनच्या ठेकेदारांना कडक भाषेत समज देत व्हॅनवरील कामगारांना काम बंद करण्याचे आदेश दिले. कारवाई करताना टोइंग व्हॅनवरील कामगारांनी नियमांचे पालन करावे, असे आदेश देखील ठेकेदारांना देण्यात आला आहे.
—चौकट—
कामगारांनी वाहन चालकांशी बोलायचेच नाही…
टोईंग व्हॅनवर असणाऱ्या कामगारांना वाहनांवर कारवाई करताना त्यांच्याशी न बोलण्याचे स्पष्ट आदेश वरिष्ठांकडून आहेत. याबाबत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देखील दिले जाते. वाहतूक पोलिसांनीच वाहन चालकांशी संवाद साधायचा आहे. परंतु, शहरात या उलट चित्र असते. वाहतूक पोलीस गाडीतच बसून असतो. हे कामगाराच खाली उतरून गाड्यांची उचला-उचली करतात आणि वाहन चालकांशीही हेच बोलण करतात, असा अनुभव आहे. पण, यानंतर आता आणखी कडक भाषेत ठेकेदारांना आदेश देऊन लागलीच बुधवारी या कामगारांना प्रशिक्षण देण्याबाबत वाहतूक शाखेत बोलविण्यात आले आहे. त्यांना पुन्हा नियमांबाबत सांगितले गेले आहे.
———–
पुणे पोलिसांचे आवाहन…
टोइंग व्हॅनवरील एखाद्या कामगाराने अरेरावी किंवा मुजोरी केल्यास नागरिकांनी थेट मारहाण करु नये. याबाबतची तक्रार वाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यास संबंधित ठेकेदाराच्या कामगारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.