सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने आघाडी धर्म सोयीस्करपणे पाळला. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावरच लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत, असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जन हिताचे जे निर्णय घेतले, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. या अनुषंगाने आयोजित बैठकीनंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार महेश शिंदे , पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते नितीन बानुगडे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, “गेल्या दोन वर्षांच्या वाटचालीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने दोन वर्ष पूर्ण केली. या सरकारने अनेक निर्णय जनहिताचे निर्णय घेतले . कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षात राज्य शासनाला तब्बल एक लाख कोटी रुपयांचा फटका बसला. तरीसुद्धा शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होऊ दिला नाही. तब्बल 22 हजार कोटींची कर्जमाफी यांसारखे महत्वाचे निर्णय घेतले.