आयुष्याची काही वर्षे वाढवायची असतील तर...

उंदरांवर केल्या गेलेल्या अशा एका प्रयोगात त्यांच्या स्नायूंना काम करण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा आवश्यक त्या प्रमाणातील एन्ज़ाइम (इंधन) न मिळाल्यामुळे स्नायूंनी काम करणी थांबवल्याचे दिसले.
article 1
Published on: 
Updated on: 

माणूस अस्तित्वात आल्यानंतर जेव्हा त्याला आपल्या आयुष्याबद्दल विचार करावासा वाटला तेव्हा त्याने सर्वप्रथम विचार त्याचे आयुष्य निरोगी कसे राहील याचा केला असेल आणि हे साहजिकच होते. आज लक्षावधी वर्षे उलटून गेल्यानंतर आणि माणसाने अनेक वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत संशोधन केले आणि त्यात अनेक नवीन शोध लावले गेले.

आज ज्या सर्वात महत्वाच्या गोष्टीचा शोध घेतला जातो आहे, त्यात माणसाला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी तर आहेच; पण त्याचे आयुष्य कसे वाढवता येईल याबद्दल देखील अनेक नवे शोध लावले जात आहेत. काही शोधांमध्ये आयुष्य वाढवायचे आणि दीर्घायुष्य करायचे असते; पण ते किती याची कल्पना नसते. काही लोक यासाठी आहार कोणता घ्यावा यासंबंधी सांगतात तर इतर काही लोक व्यायाम अथवा योगासनांवर भर देतात. काही देशात शतायुषी माणसांची संख्या अधिक आहे. तेथील लोक मोठ्या प्रमाणावर वनस्पतीपासून तयार झालेला आहार घेतात असे म्हटले जाते. परंतु, आज सुरु असलेल्या संशोधनावरून असे दिसले आहे की दिर्घायुष्य मिळवण्याचा तो एक मार्ग आहे, याच विषयावर संशोधन करीत असताना काही खास बाबी लक्षात आल्या आहेत. त्या खरे तर विश्वास बसणार नाहीत इतक्या सोप्या असल्या तरी आपल्याला त्या आजपर्यंत का लक्षात आल्या नाहीत, असा प्रश्न आपल्या मनात येऊन जाईल. माणसासहित सर्व प्राण्यांच्या शरीरांबद्दल असे म्हटले जाते की, या सर्व शरीरांना नियमित विश्रांती मिळणे आवश्यक असते आणि तशी विश्रांती मिळाली नाही तर त्यांची आयुष्य मर्यादा कमी होते.

आपल्याला जर असे वाटत असेल की, खुर्ची अथवा सोफ्यावर बसून आपण विश्रांती घेऊ शकतो तर तसे होत नाही. उलट यामुळे शरीराला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. बसणे ही क्रिया अतिशय सोपी वाटत असली तरी ती योग्य प्रकारे केली जायला हवी, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. यासाठी वैज्ञानिकांच्या एका चमूने उत्तर टांझानियाच्या एका शहरात दहा वर्षे संशोधन केले. या शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुदृढ आणि प्रदीर्घ आहे असे अगोदर सिद्ध झाले होते. टांझानियामधील हा हाद्झा नावाचा समाज होता. या चमूने आपल्यासोबत या लोकांची प्रत्येक हालचाल नोंदवून घेईल अशी उपकरणे आणली होती. या समाजातील पुरुष आणि महिला दिवसभर शेती, शिकार, जंगलातील फळे, वनस्पती आणि मध गोळा करणे यामध्ये आपला वेळ घालवीत असत. हा समाज इतका निरोगी आणि दीर्घायुषी का आहे हे आम्हाला समजावून घ्यायचे होते.

सर्वसाधारणपणे बसण्यासाठी माणसाला खुर्ची हवी असते आणि ती मग पाचवीला पुजल्यासारखी माणसाला सोडतच नाही. खुर्ची एखाद्या चुंबकासारखी माणसाला खेचून घेते असे म्हटले तरी चालेल; कारण याची उदाहरणे तर आपण रोज बघतच असतो.

कोविडच्या काळात अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील साथीच्या रोगांचे तज्ञ असलेल्या आय-मिन ली या वैज्ञानिकाने हृदय रोग, मधुमेह आणि कर्करोग यापासून होणाऱ्या मृत्यूंची माहिती एकत्र केली होती. त्यात त्यांनी ‘बैठक’ अथवा ‘बसणे’ हे यामागील सामान्य कारण होते असे त्यांनी ‘लॅन्सेट’ या सुप्रसिद्ध विज्ञान नियतकालियातील आपल्या लेखात मांडले होते. आपल्या लेखात ते पुढे असे म्हणाले होते की, बराच काळ काहीच न करता बसणाऱ्या माणसांपैकी जगात दरवर्षी किमान ५० लाख लोकांचे मृत्यू होतात. आरोग्यासाठीचा हा धोका धूम्रपान आणि लट्ठपणा या विकारांइतका आहे. कार्यालयांमध्ये दिवसभर बसून काम करणाऱ्या मंडळींनी रोज व्यायाम करायचे ठरवले तरी त्यामुळे दिवसभराच्या बैठक मारून बसण्यामधील धोका फारसा कमी होत नाही. बसणे किंवा बैठक कदाचित व्यायामाच्या अभावापेक्षाही वाईट असू शकेल.

दीर्घकाळ बसून राहण्यामुळे अगदी तुम्ही काम करीत असाल तरी आजच्या औद्योगिक जगात रोग तुमची पाठ सोडणार नाहीत, असे आणखी एका सर्वेक्षणावरून दिसले. लंडन शहराच्या वाहतूक विभागामधील चालक आणि वाहक यांच्या बाबतीत हे सर्वेक्षण केले गेले. अशा ३१,००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा दोन वर्षे अभ्यास केला तेव्हा असे दिसले की ३० टक्के अधिक वाहन चालक हे तरुण वयातच याच वयाच्या वाहकांपेक्षा हृदयरोगाच्या आसपास होते. हेच निष्कर्ष पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी आणि पोस्टमन यांच्या बाबतीत मिळाले.

याचे वैज्ञानिक कारण देताना असे म्हटले गेले आहे की, उभे राहताना आणि चालताना आपल्या पायांचे आणि शरीराचे स्नायू आपल्याला स्थिर उभे करण्यासाठी काम करीत असतात. खुर्चीवर अथवा गादीवर बैठक मारणे यामुळे आपण नकळत हे स्नायू बंद करतो. ओले कपडे दोरीवर पसरवण्याऐवजी गोळा करून टाकण्यासारखी ही क्रिया होते. स्नायूंची हालचाल महत्वाची आहे. उंदरांवर केल्या गेलेल्या अशा एका प्रयोगात त्यांच्या स्नायूंना काम करण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा आवश्यक त्या प्रमाणातील एन्ज़ाइम (इंधन) न मिळाल्यामुळे स्नायूंनी काम करणी थांबवल्याचे दिसले.

पुन्हा खुर्चीकडे वळू या...

पुराणवस्तू शास्त्रानुसार खुचीचा जन्म शेती, शहरी आणि धातू विज्ञान यांच्या शोधानंतर म्हणजे अंदाजे पाच हजार वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. त्यापूर्वी खुर्ची नव्हती आणि प्राचीन काळापासून माणसे मांडी घालून बसत असत. त्यामुळे स्नायूंना आवश्यक इंधन मिळत असे. मांडी घालून बसण्याचे अनेक प्रकार आहेत आणि ते सर्व आरोग्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी उपयुक्त आहेत.

टांझानियामधील ज्या समाजात हे संशोधन केले गेले तेथील लोक रोज अंदाजे १० तास विश्रांती घेतात असेही दिसून आले. दिवसातून किमान ५० वेळा ते आपली स्थिती बदलीत असत. बैठकीच्या स्थितीमध्ये आपल्या शरीराला समतोल राहणी भाग पडते हा एक फायदा होतो तर त्यामधून स्नायूंची हालचाल खुर्चीपेक्षा १० पट अधिक होते.

अर्थात एकूणच माणसाच्या आयुष्यात तो १० तास विश्रांती घेऊ शकेलच असे सांगता येत नाही आणि तो आपली स्थिती दैवासातून वारंवार बदलू शकेलच असेही नाही. पण जेवढे जमेल तेवढे करता आले तरीही आपल्या आयुष्याची काही वर्षी वाढवता येतील इतकी क्षमता खुर्चीपासून दूर राहण्याची आहे. चालते राहणे आणि शक्य असेल तेव्हा मांडी घालून बसणे हे आपल्याला करता येईल.

- श्याम तारे