संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच पोषण आहार दिला जात असतो. या पोषण आहारात वेगवेगळे पदार्थ, अन्न असा पूरक आहार दिला जात असतो. मात्र येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पोषण आहारात सोया मिल्क देखील दिले जाणार आहे. प्राथमिक अनुदानित, खाजगी शाळांसाठी ही योजना आहे. शालेय पोषण आहारामध्ये सकस व पूरक अन्न दिले जात आहे.
जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आता येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषण आहार दिला जाणार आहे. त्यामुळे यंदापासून पूरक आहार सोबत विद्यार्थ्यांना अंडी, केळी, मनुका दिले जात असून येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून सोया मिल्क देखील दिले जाणार आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळा, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानंतर आठवीपर्यंत तिचा विस्तारही करण्यात आला आहे.