
सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली जिल्हा बँकेवर स्वाभिमानीच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्ते बँकेत घुसले, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दरम्यान, नेत्याची कर्जे राईट ऑफ करण्याचा निर्णय मागे घेण्याबरोबरच शेतकऱ्यासाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करून ती पाच वर्षे सुरू ठेवू, असे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी जाहीर केले. हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश असून अर्धी लढाई जिंकली आहे, पण यापुढेही ही बँक शेतकऱ्याची राहावी नेत्याची होवू नये यासाठी रक्ताच्या शेवटच्या ठेंबापर्यंत लढत राहू, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणा बाजी करत कार्यकर्ते मुख्य गेटवर आले, त्यावेळी पोलिसांनी अडवले कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. काही कार्यकर्ते दुसऱ्या गेटमधून आत घुसले. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी एकच दंगा झाला.
यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले , “पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने बँकेचा राजकीय अड्डा करण्यात आला आहे, राष्ट्रवादी पक्षात घेण्यासाठी अनेकांच्या संस्थांना नियमबाह्य मदत करण्याचे धोरण घेतले जात आहे, त्याच्या संस्थांची कर्जे राईट ऑफ करणे, व्याजात सवलत देणे, कर्जाचे पूनरघटन करणे, आदींचा घाट घातला जात होता. मात्र, आम्ही तो हाणून पाडला, राईट ऑफचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडले, तसेच शेतकऱ्यासाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू करायला भाग पाडली.
ही योजना २०१८ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यासाठीच लागू केली होती, ती २०१९ – २०२१ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही पुढील पाच वर्षे लागू राहणार आहे, त्याचबरोबर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजात सवलत देण्यात येणार आहे.
मार्चनंतर बँकेचा ताळेबंद बघून एक टकके व्याजात सवलत देण्याबाबत ही होकार दर्शविला आहे.
अवकाळीने नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यासाठी व्याजात सवलत देण्याचीही तयारी बँकेने दर्शिविली आहे, तसेच साखर कारखान्याच्या पुनर्घटन योजनेला ही स्थगिती दिली आहे, हे सर्व स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे,” असे खराडे यांनी सांगितले.