TDM Marathi Movie – दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन मिळत नसल्यानं या चित्रपटाचे शो थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. 9 जून 2023 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना कमी स्क्रीन मिळत असल्याचं सत्य समोर आलं होतं. (TDM)
दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी यापूर्वी ख्वाडा,बबन सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. अस्सल गावरान ढंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चित्रपटाचा ट्रेलर झाल्यानंतर प्रत्येकाला या सिनेमाची उत्सुकता लागली होती. या चित्रपटात दोन नवोदीत कलाकार आहेत. चित्रपटाचा हिरो पृथ्वीराज आणि नवोदीत अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांच्या भूमिका खरोखरच वाखाण्याजोग्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख सांगताना भाऊराव कऱ्हाडे यांनी प्रेक्षकांचे आभार मानलेत. आज मला पुन्हा उभ राहण्याचं बळ तुमच्यामुळंच मिळालं असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्रेक्षकांना चित्रपट पाहायचा होता, पण त्याच्या स्क्रिन्स नव्हत्या. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला होता. मी म्हणत नाही की, फक्त माझाच चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, पण प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळायला हवी, असंही ते म्हणाले.
नॅशनल अवॉर्ड विनर अशा दिग्दर्शकासोबत घडलेल्या या घटनेनंतर अनेकांनी आवाजही उठवण्यात आला होता. या चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूरमध्ये शहरातून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर रॅली काढली होती. एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटल्याचं दुर्मिळ चित्र पहायला मिळालं होतं. राजकीय नेत्यांच्या पाठींब्यामुळेच चित्रपट रिलीज करण्यासाठी बळ मिळालं.
चित्रपटाचा ट्रेलर
[read_also content=”लग्नाच्या तीन महिन्यांतच स्वरा भास्कर गरोदर, नवऱ्यासोबत शेयर केला गोड फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव! https://www.navarashtra.com/entertainment/swara-bhaskar-is-pregnant-within-three-months-of-marriage-shared-the-sweet-with-her-husband-nrps-411420/”]
TDM (ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा)
शिक्षण अर्धवट राहिलेल्या मुलांसाठी TDM (ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा) ही पदवी किर्तनकार इंदूरीकर महाराजांनी बहाल केली होती. यावरूनच या चित्रपटाचं नाव TDM ठेवण्यात आलं. ट्रॅक्टर आल्यानंतर लोकांच्या आयुष्यात होणारा बदल या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. येत्या 9 जून ला TDM हा चित्रपट पुन्हा नव्या जोमानं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यानं , तो पाहावा असं आवाहानही भाऊराव कऱ्हाडेंनी प्रेक्षकांना केलंय.