खटाव : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने शनिवारी (दि.५) नवजीवन दिले. वन विभागाद्वारे एखाद्या वन्य प्राण्याला जीवदान देण्याची ही घटना घडली. विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देत त्याला नैसर्गिक अधिवासातही सोडण्यात आले.
शेतकरी विनय माने यांच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडला होता. विनय माने आपल्या मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे शेतात आले आसता त्यांच्या छोट्या मुलीला विहिरीत कोल्हा दिसला. याची माहिती माने यांनी तात्काळ वन विभागाला दिली. वन विभागाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोरी व पोते घेऊन स्थानिकांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खोल विहिरीत उतरून कोल्ह्याला केवळ १५ मिनिटांतच सुरक्षितपणे बाहेर काढले व नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
वनरक्षक संभाजी दहीफळे, वनमजूर बबन जाधव, संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले. त्यासाठी येथील स्थानिक ग्रामस्थ आबासाहेब काटकर, विनय माने, राजेश माने व विजय मोरे यांचे विशेष सहकार्य मिळाले, अशी माहिती वनक्षेत्रपाल शीतल फुंदे यांनी दिली.
वन्यप्राण्यांना इजा करू नये
विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची वनविभागाच्या कर्मचार्यांनी तपासणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अलीकडे भक्षाच्या किंवा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी विहिरीमध्ये पडण्याच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी अशा बाबतीत वन्यप्राण्यांना इजा न करता वनविभागाशी त्वरीत संपर्क साधून सहकार्य करावे, असे वन क्षेत्रपाल शीतल फुंदे यांनी सांगितले.