नाला ओलांडताना मुख्याध्यापकाचा मृत्यू; दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. अशातच नाला ओलांडण्याचा प्रयत्नात एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
वसंत सोमा तलांडी (४४, रा. जोनावाही, ता. भामरागड) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. पल्ले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होते. शाळा सुटल्यानंतर ते आपल्या मूळगावी जोनावाहीकडे सिपनपल्ली मार्गे सोमवारी (दि. १८) परतत असताना सायंकाळच्या सुमारास सिपनपल्ली नाला ओलांडताना वाहून गेले. संततधार पावसामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसासह अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. परिणामी, चाकरमान्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
दरम्यान, वसंत तलांडी हे पाण्यात वाहून गेल्याची माहिती महसूल व पोलिस विभागास देण्यात आली. घटनेनंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सिपनपल्ली नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने संबंधित मुख्याध्यापकाच्या नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता, मृतदेह वसंत तलांडी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन महिला गेल्या वाहून
दुसऱ्या एका घटनेत, राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर सुरु आहे. नदी नाल्याला पूर आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथील रस्त्यावरील नदीपात्रात रात्री एक कार वाहून गेली. या कारमध्ये चार जण होते, त्यापैकी तिघांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हासनाल गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत.