Ukrainian President Volodymyr Zelenskiy
रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध (Russia Ukraine War) आता गंभीर वळणावर येऊन ठेपलं आहे. रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv) धडकल्या आहेत. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी रशियन फौजांनी (Russian Army) कीवमधल्या महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे युक्रेनच्या फौजा देखील रशियन फौजांचा प्रतिकार करत आहेत. रशियन फौजांनी याआधीच चेर्नोबिल प्लांट ताब्यात घेतला आहे. आता कीवमध्ये हल्ला करून युक्रेनमधलं सरकारच खाली पाडण्याच्या इराद्याने रशियन फौजा मार्च करत असून युक्रेननं देखील मागे न हटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानीत घुसून तिथल्या सरकारला खाली खेचलं होतं. या आक्रमणावेळी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी पळ काढल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती सध्या युक्रेनमध्ये दिसत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण कीवमध्येच थांबणार असून कुटुंबीय देखील कीवमध्येच आहेत, असं ठामपणे सांगितलं आहे.
Ukrainian President Volodymyr Zelenskiy vowed to stay in Kyiv as his troops battled Russian invaders advancing toward the capital in the biggest attack on a European state since World War Two https://t.co/Nmq595uKdJ pic.twitter.com/VChMcAGRdf
— Reuters (@Reuters) February 25, 2022
वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये रशियाच्या हल्ल्यापुढे नमणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
“शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंबदेखील युक्रेनमध्येच आहे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं आहे.
[read_also content=”ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/nawab-malik-not-feeling-well-admitted-to-jj-hospital-nrsr-245020/”]
गुरुवारी रशियाने जमिनीवरून, सागरी मार्गाने आणि हवाई मार्गाने युक्रेनवर हल्ला चढवला. तब्बल १ लाख सैन्याने युक्रेनमध्ये शिरून तिथल्या फौजांचा प्रतिकार मोडून काढायला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर अखेर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले. आज युद्धाचा दुसरा दिवस असून रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.