विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक
कोल्हापूर : मागील अनेक महिन्यांपासून ऐतिहासिक अशा विशाळगडावर अतिक्रमणं वाढली आहेत. अनेक शिवभक्तांनी व गडसंवर्धन करणाऱ्या व्यक्तींनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता प्रकरणामध्ये कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाळगडावरील वाढत्या आतिक्रमणांवरुन त्यांनी लाखो शिवभक्तांसह विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चलो_विशाळगड’ अशी मोहिम घेऊन संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे निघाले आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमणामुळे शिवभक्त आक्रमक झाले आहेत. अनेकांनी याबाबत आवाज उठवला असून सर्व स्तरावर रोष व्यक्त केला जात. या वाढत्या अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी देखील विशाळ गडावर दौरा केला आहे. कोल्हापुरातील जुना राजवाडा येथे तुळजाभवानी देवीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गादी यांचे दर्शन घेऊन तसेच करवीर राजगादी व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन संभाजीराजे यांनी विशाळगडाकडे प्रस्थान केले आहे. लाखो तरुणांनी हाती भगवा झेंडा घेत आणि विशाळगड अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे या आशयाचे पोस्टर हाती घेत विशाळगडाकडे धाव घेतली आहे. ‘हर हर महादेव’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे कोल्हापूर शहर दुमदुमले आहे. त्यांच्यासोबत संभाजीराजे छत्रपती देखील सामील झाले आहेत. पावनखिंडमधून ते विशाळगडाकडे जाणार आहेत.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
चलो विशाळगड या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “काल पावनखिंड संग्रामदिन साजरा करण्यात आला. मात्र आज विशाळगड संकटामध्ये आहे. शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने सुरक्षित केलं आणि स्वराज्यचं रक्षण केलं अशा विशाळगडावर आज अतिक्रमण झालेलं आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. या निमित्ताने आम्ही सर्व शिवभक्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही जात आहोत. विशाळगडावर शिवभक्तांना जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. विशाळगड अतिक्रमणमुक्त झाला पाहिजे. महाराणी ताराबाईंची ती राजधानी देखील होती, त्यामुळे विशाळगड मुक्त झालाच पाहिजे. यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर मला अभिमान वाटेल,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.