
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरण केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाचे NCB विभागीय संचालक समीर वानखेडेंनी केलेल्या कारवाईनंतर अनेकदा त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वानखेडेंवर विविध आरोपही केले जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने सूचक ट्विट केलं आहे.
या ट्वीटमध्ये मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने “जेव्हा तुम्ही लाटेच्या विरुद्ध दिशेने पोहता, तेव्हा तुम्ही बुडू शकता. पण जर तुम्ही सर्वात शक्तिशाली असाल तर मात्र जगातील कोणतीही लाट तुम्हाला बुडवू शकत नाही. कारण सत्य हे फक्त त्याला माहिती आहे. शुभ सकाळ, सत्यमेव जयते,” असं म्हटलं आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं मुंबईत क्रूझवर ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला. या कारवाईनंतर एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचं. या कारवाईनंतर त्यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी आरोप केलेत. तर रविवारी या प्रकरणात आणखी नवा ट्विस्ट आला. या प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.