Wadia Hospital Heart Transplant: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबई : गंभीर हृदयविकारामुळे जीवघेण्या स्थितीचा सामना करणाऱ्या १७ वर्षीय बाल रुग्णावर बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॅार चिल्ड्रन येथे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रुग्ण कु. तन्मय शिंदे याच्या हृदयाची कार्यक्षमता अत्यंत कमी झाल्याने त्याला प्रत्यारोपणाची नितांत गरज होती. Wadia Hospital Heart Transplant:
योग्य दात्याचे हृदय उपलब्ध झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने त्याला मुलुंड येथून अवघ्या २५ मिनिटांत वाडिया रुग्णालयात आणले. बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॅार चिल्ड्रन बाल ऱ्हदयरोग तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या नेतृत्वाखाली या बाल रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले.
नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारा कु. तन्मय शिंदे (१७वर्षे) याला १ डिसेंबर रोजी वाशी येथील एका रुग्णालयात डायलेटेड कार्डिओमायोपॅथी या हृदयविकाराचे निदान झाले. पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर आठवडाभरातच त्याला धाप लागणे, छातीत दुखणे आणि थकवा जाणवू लागला.
त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी गंभीर अवस्थेत त्याला बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॅार चिल्ड्रन येथे दाखल करण्यात आले. येथे डॉ. बिस्वा पांडा यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर पुढील तपासणी आणि विशेष उपचार सुरू करण्यात आले.
बाल ऱ्हदयरोग तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांनी सांगितले की, डायलेटेड कार्डिओमायोपॅथी या आजारात हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता कमी होते आणि हळूहळू हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. सामान्यतः हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता दर्शवणारे इजेक्शन फ्रॅक्शन (EF) हे प्रमाण ५५ ते ६५ टक्के असते. मात्र, तन्मयच्या हृदयाची ही क्षमता सुरुवातीला २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घसरली होती.
पुढे त्याची प्रकृती अधिक खालावल्याने हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आली. अतिदक्षता विभागातील उपचार आणि औषधांमुळे ती तात्पुरती २० ते २५ टक्क्यांपर्यंत सुधारल्याचे आढळले. तन्मयला १५ डिसेंबर रोजी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि २८ जानेवारी रोजी घरी सोडण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतरही त्याची प्रकृती नाजूकच होती. त्यामुळे पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी त्याला वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते.
तन्मयच्या हृदयाची कार्यक्षमता खूपच कमी झाल्याने हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी डॉक्टरांच्या पथकाने तन्मयच्या कुटुंबीयांना त्याच्या प्रकृतीची माहिती देत हृदय प्रत्यारोपणाची गरज समजावून सांगितली. त्यानंतर झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) मार्फत तन्मयचे नाव हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आले. योग्य दात्याचे हृदय उपलब्ध होण्याची तन्मय आणि त्याचे कुटुंबीय वाट पाहत होते.
हृदय प्रत्यारोपणासाठी दाता आणि रुग्णाचा रक्तगट जुळणे आवश्यक असते. त्याचबरोबर दोघांचे वय, वजन आणि शरीराचा आकार यांचाही विचार केला जातो. विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन रुग्णांसाठी योग्य आकाराचे हृदय मिळवणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी योग्य दात्याचे हृदय वेळेत उपलब्ध होणे आणि त्याचे नियमानुसार वाटप होणे महत्त्वाचे ठरते.
६ ऑक्टोबर रोजी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात योग्य दाता उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांच्या टिमला मिळाली. ब्रेन डेड झालेल्या २२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तन्मयच्या हृदय प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला. आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि झेडटीसीसीच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे हृदय तन्मयच्या प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करुन देण्यात आले.
हृदय प्रत्यारोपणासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते, असे डॉ. पांडा यांनी सांगितले. दात्याच्या शरीरातून हृदय काढल्यानंतर ते योग्य पद्धतीने जतन करून कमीत कमी वेळेत प्रत्यारोपणासाठी पोहोचवावे लागते. तन्मयच्या बाबतीत ग्रीन कॉरिडॉरमुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयातून वाडिया रुग्णालयापर्यंतचे २३.९ किलोमीटरचे अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले.
दात्याचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या टिमने तन्मयला शस्त्रक्रियेसाठी तयार केले. याबाबत डॉ. पांडा म्हणाले, दाता आणि रुग्ण यांच्यावर उपचार करणाऱ्या दोन्ही टिमच्या समन्वयाने काम केले. त्यामुळे हृदय रुग्णालयात पोहोचताच प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करता आली.
या शस्त्रक्रियेत हृदयाशी जोडल्या जाणाऱ्या प्रमुख रक्तवाहिन्या आणि शिरा काळजीपूर्वक जोडण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यारोपित हृदयाने नियमितपणे कार्य सुरू केले. दात्याचे हृदय धडधडणे थांबल्यापासून तन्मयच्या शरीरात प्रत्यारोपित हृदय पुन्हा धडधडू लागेपर्यंतचा कालावधी हा सुमारे तीन तासांचा होता.
Delivery Problems: ‘डिलिव्हरीनंतर युरीन लीक होतंय…’ नव्या आईची समस्या, तज्ज्ञांनी केला खुलासा
तन्मयची प्रकृती अत्यंत गंभीर होती. वेळीच उपचार मिळाले नसते, तर त्याच्या शरीरातील इतर अवयव निकामी होण्याचा धोका होता. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे योग्य वेळी अवयव मिळणे, जलद वाहतूक आणि वेळीच उपचारांचे महत्त्व अधोरेखित झाले.
शस्त्रक्रियेनंतर तन्मयला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. तेथे सात दिवस त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर औषधोपचारांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. त्याने हळूहळू अन्नाचा स्विकार करणे, चालणे आणि दैनंदिन हालचाली सुरू केल्या. त्याच्यासाठी कार्डियाक रिहॅबिलेशन आणि फिजिओथेरपीही सुरू करण्यात आली आहे. सध्या त्याला अतिदक्षता विभागातून रुग्णालयाच्या जनरल वॅार्डमध्ये हलविण्यात आले आहे.
तन्मयला अद्याप रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले नाही. प्रत्यारोपित हृदय शरीर स्वीकारत आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याची बायोप्सी केली जाणार आहे. त्यानुसार औषधोपचारांमध्ये बदल केले जातील. प्रत्यारोपित अवयव शरीराकडून नाकारला जाण्याचा धोका कमी करण्यासाठी त्याला आयुष्यभर रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करणारी औषधे घ्यावी लागतील. नियमित वैद्यकीय तपासण्या आणि संसर्गापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल. वैद्यकीय गरजेनुसार त्याला काही काळ इतरांपासून वेगळे ठेवण्याची आवश्यकता भासू शकते.
तन्मयचे वडील अशोक शिंदे हे बस चालक म्हणून काम करतात, तर आई सुजाता ही एक गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या महागड्या उपचारांचा खर्च उभा करणे मोठे आव्हान होते. मात्र, यासाठी निधी संकलित करण्यात आला आणि त्यातून या प्रत्यारोपणाच्या खर्चाची व्यवस्था करण्यात आली.
तन्मयच्या पालकांनी सांगितले, तन्मय नवी मुंबईतील महाविद्यालयात बारावीत शिकत होता. त्याला डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचे निदान झाल्यानंतर त्याला महाविद्यालयात हजर राहणे देखील कठीण झाले आणि तो परीक्षाही देऊ शकला नाही. या आजाराच्या निदानामुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. त्याच्या आरोग्याची आणि भविष्याची आम्हाला सतत चिंता वाटत होती.
आमच्या मुलाला नवे आयुष्य देणाऱ्या दात्याच्या कुटुंबाचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तसेच डॉ. बिस्वा पांडा आणि वाडिया रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय टिमने वेळीच उपचार करून त्याची काळजी घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो. तन्मयची प्रकृती आता सुधारत आहे. पुढील वर्षी तो बारावीची परीक्षा देऊ शकेल आणि त्याचे शिक्षण पुन्हा सुरू करू शकेल, अशी आम्हाला आशा आहे.
बालकांमधील अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करताना डॉ. बिस्वा पांडा म्हणाले, प्रौढांमध्ये हृदय प्रत्यारोपण ही उपचारपद्धती प्रस्थापित झाली असली, तरी मुलांमध्ये ती तुलनेने कमी प्रमाणात केली जाते. यामागील एक मोठे कारण म्हणजे योग्य दात्याच्या हृदयाची कमतरता. गंभीर हृदयविकार असलेल्या मुलांना त्यांच्या शरीराच्या आकारमानाशी आणि वैद्यकीय गरजांशी जुळणारे हृदय मिळेपर्यंत प्रतीक्षा यादीत राहावे लागू शकते. त्यामुळे बालकांच्या अवयवदानासह अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. योग्य अवयवदानामुळे एखाद्या मुलाला नवे आयुष्य मिळू शकते आणि त्याच्या कुटुंबाला भविष्याची नवी आशा मिळू शकते.
वाडिया रुग्णालयाच्या हृदय निकामी झालेल्या बालरुग्णांकरिता असलेल्या विशेष उपचार केंद्रात सध्या सुमारे ३०० मुलांवर उपचार आणि नियमित तपासणी केली जात आहे. या मुलांमध्ये आजाराचे वेळीच निदान करणे, नियमित तपासणी करणे आणि गरजेनुसार प्रगत उपचार पुरविणे यावर रुग्णालयाकडून विशेष भर दिला जात आहे. हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या मुलांना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय प्रयत्नशील आहे. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलांसाठी अवयवदानाबाबत जनजागृती आणि समाजाचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
वाडिया बालरुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, तन्मयवरील यशस्वी हृदय प्रत्यारोपण हे रुग्णालयासाठी महत्त्वाचे यश आहे. मुलांमधील गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आमच्या विशेष वैद्यकीय सेवा अधिक सक्षम होत आहेत. यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर आता हृदय प्रत्यारोपणाचाही यात समावेश झाला आहे.
अशा शस्त्रक्रियेसाठी योग्य दात्याचे हृदय मिळवणे, ते वेळेत रुग्णालयात पोहोचवणे आणि प्रत्यारोपणानंतर रुग्णाची काळजी घेणे या सर्व टप्प्यांवर डॉक्टरांच्या टिममध्ये उत्तम समन्वय साधणे आवश्यक असते. गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांना प्रगत उपचार मिळावेत, यासाठी आमची टिम सतत प्रयत्न करत आहे. या यशामुळे अवयवदानाबाबत जनजागृती वाढेल आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिक मुलांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
Ans: मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
Ans: तन्मयला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा हृदयाचा गंभीर आजार झाला होता. त्यामुळे त्याच्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.
Ans: प्रत्यारोपित हृदय शरीर स्वीकारत आहे की नाही, याची नियमित तपासणी करावी लागते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करणारी औषधे आयुष्यभर घेणे, नियमित तपासण्या करून घेणे आणि संसर्गापासून बचाव करणे आवश्यक असते.






