प्रेम ही भावना जितकी सुंदर, तितकीच नाजूकदेखील असते. आपल्या मनातील भावना एखाद्याला सांगताना आपण भावनिकदृष्ट्या फार गुंतलेले असतो. मात्र, प्रपोज करणे म्हणजे फक्त ‘आय लव्ह यू’ म्हणणे नाही, तर त्या व्यक्तीसमोर आपल्या भावनांचं योग्य आणि प्रभावी सादरीकरण करणे. त्यामुळे तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवे की, चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी प्रपोज केल्यास समोरील व्यक्तीचा नकार मिळू शकतो. म्हणूनच, प्रपोज करताना काही गोष्टींचं भान ठेवणं अत्यावश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचानक प्रपोज करू नका. तुमचं नातं अजून स्पष्ट नसेल, तर अशावेळी अचानक प्रेम व्यक्त करणे समोरील व्यक्तीला अस्वस्थ करू शकतं. सुरुवातीला एकमेकांमध्ये मैत्रीची घट्ट वीण तयार करा. दुसरं म्हणजे प्रपोज करण्यासाठी योग्य वेळ आणि जागेची निवड करा. सार्वजनिक ठिकाणी, अनेक लोकांसमोर प्रपोज करणे मुलींना आवडेलच असं नाही. अनेक मुलींना आपले रिलेशनशिप खाजगी ठेवणं जास्त पसंत असतं. त्यामुळे तिची आवड-निवड ओळखून शांत, देखणं आणि खासगी वातावरणात प्रपोज करणे योग्य ठरते.
वेळेचं भान ठेवा. समोरची व्यक्ती तणावात आहे, परीक्षेचा काळ आहे, किंवा ऑफिसमधील अडचणींनी त्रस्त आहे, अशा वेळी प्रपोज केल्यास तुमच्या भावना दुर्लक्षित होऊ शकतात. तिला पूर्ण वेळ आणि मानसिक स्थैर्य असताना आपली भावना व्यक्त करा. तुमचं नातं कितपत घट्ट आहे, याचा विचार करा. प्रेमाची कबुली देण्याआधी तुम्ही दोघं एकमेकांना कितपत ओळखता, विश्वास किती आहे, आणि मैत्री किती खोल आहे, हे जाणून घ्या. नातं केवळ आकर्षणावर आधारित असेल, तर प्रपोज करून नकार मिळण्याची शक्यता जास्त असते.
तसंच, प्रपोज करण्यास खूप वेळ लावू नका. अनेकदा आपण योग्य वेळ शोधता शोधता तो क्षणच निघून जातो. त्यामुळे दोघांच्याही भावना परिपक्व झाल्या आहेत, हे जाणवू लागल्यावर वेळ न दवडता योग्य पद्धतीने भावना व्यक्त करा. प्रपोज करताना आपल्या भावना प्रामाणिकपणे, आत्मविश्वासाने आणि समोरच्याच्या भावनांचा आदर ठेवून मांडाव्यात. योग्य वेळ, योग्य जागा आणि योग्य शब्दांचा वापर केला, तर तुमचं प्रेम नक्कीच स्वीकारलं जाईल. होकार हवाय ना? मग वरील टिप्स लक्षात ठेवा!