फोटो सौजन्य - Pinterest
एक व्यक्ती दिवसभर कष्ट करतो. संपूर्ण दिवस त्या व्यक्तीचा काबाडकष्टात जातो. त्याच्या डोक्यावर घराचा भार, कामाचा भार तसेच इतर भार असतात. त्या व्यक्तीला स्वतःसाठी वेळ काढायलाही वेळ नसतो इतका तो कामात व्यस्त असतो. त्याचा दिवस फक्त आणि फक्त कामात जात असतो. शेवटी त्याची घरी जायची वेळ येते. कामावरून सुटून दिवसभर काम करून थकलेला-कोमेजलेला तो चेहरा घरी कधी पोचतोय, या उत्सुकतेत असतो. इथल्या-तिथल्या तणावामुळे तो चेहरा फार उदास असतो. पण इतक्यात त्या व्यक्तीच्या नजरेसमोर एका बाळाचे सुंदर हसतं मुख येते. त्या बाळाच्या हसऱ्या मुखड्याला पाहून या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तेज येते. त्याचे हसू पाहून याच्या चेहऱ्यावर अचानक हसू येते, जणू तो त्या भारापासून, धगधगीच्या जीवनापासून मुक्त झाला आहे. इतक्यात ते बाळ समोरून त्याच्या वाटेने निघून जाते आणि या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे तेज पुन्हा गायब होते, आणि परत तीच उदासी याच्या चेहऱ्यावर येते.
या गोष्टीतील विशेष बात म्हणजे तो उदास असलेला व्यक्ती काही क्षणासाठी त्याच्या उदासीला विसरतो. त्याला असलेल्या घरातील भारापासून, कामातील भारापासून, जणू काही थोड्या वेळासाठी मुक्त होतो. तो क्षण, ती वेळ, त्या बाळाचा हसऱ्या चेहऱ्याला बघून येते. या हसऱ्या चेहऱ्यातच इतकी जादू आहे. खरंच, हसणारा कोणताही चेहरा कधीच कुरूप असू शकत नाही. पण या गोष्टीतील महत्वाची बाब म्हणजे ते बाळ हसत-हसत त्याच्या वाटेने जातं पण जसं ते जातं ह्या व्यक्तीचा झालेला हसरा चेहरा पुन्हा त्या उदासीत येतं. असे का? कारण लहान बाळांमध्ये भावना बदलण्याची गती मंद असते तेच प्रौढ व्यक्तींमधे ती गती जलद असते. फक्त हसण्याबाबतीतच नाही तर एखादा बाळ जर रडत असला तर तो प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त काळ रडू शकतो. तर एखादा बाळाने हसायला चालू केले तर तो प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त काळ हसू शकतो, कारण लहान बाळांमध्ये भावना बदलण्याची गती मंद असते.






