स्तनपानामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी
आई आणि बाळासाठी स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. नव मातांनी आपले बाळ निरोगी राहण्यासाठी आणि स्तनाच्या कर्करोगापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्तनपान करणे ही काळाची गरज आहे. स्तनाच्या कर्करोगामुळे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते म्हणाले की, स्तनपानामुळे आई आणि मूल यांच्यातील नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होते तसेच बाळाचे आणि आईचे आरोग्य उत्तम राहते. आई आणि मुलाच्या आरोग्यासाठी स्तनपान आवश्यक आहे. स्तनपान दिले जाणाऱ्या बाळाला दमा, लठ्ठपणा, कान आणि श्वसन संक्रमण, नवजात बाळाचा अचानक मृत्यू होणे आणि अतिसार सारख्या पोटाच्या संसर्गाची शक्यता कमी असते. स्तनपानामुळे आईला रक्तदाब, टाईप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, लठ्ठपणा, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतात तज्ज्ञ
स्तनपान जागरूकता
डॉ गुप्ते पुढे म्हणाले की, स्तनपानामुळे भविष्यात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका देखील कमी होतो. याशिवाय स्तनपानामुळे महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचे उत्पादनही कमी होते. इस्ट्रोजेन हा हार्मोन आहे जो स्तनाच्या ऊतींच्या वाढीस उत्तेजन देतो आणि उच्च इस्ट्रोजेन पातळी थेट स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे.
स्तनपानाचा सल्ला
स्तनाचा कर्करोग हा मोठ्या संख्येने स्त्रियांमध्ये आढळून येणारा कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे आणि त्यामुळे मृत्यूदर वाढतो. याशिवाय स्तनपान केल्याने गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. नवजात मातांना स्तनपानाच्या महत्त्वाबाबत शिक्षित केले पाहिजे. नव मातांना कमीत कमी सुरुवातीचे 6 महिने आणि जास्तीत जास्त १ वर्ष पोषक आहारासह स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो.
कर्करोगाची शक्यता कमी
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी
टीजीएच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मृणाल परब म्हणाल्या की, स्तनपानामुळे स्तनाच्या ऊतींना कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. स्तनातून दूध बाहेर पडताना स्तनाच्या ऊती संकुचित होतात. या दरम्यान फॅट पेशी दूध तयार करणाऱ्या पेशींची जागा घेतात. या प्रक्रियेदरम्यान, मासिक पाळीच्या दरम्यान विकसित झालेल्या कोणत्याही असामान्य पेशी नष्ट होतात आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
हेदेखील वाचा – भारतात 30 पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग, लक्षणे कशी दिसतात?
महिलांनी काय करणे आवश्यक
ज्या स्त्रिया स्तनपानात करत आहेत त्या पौष्टिक आहार, शारीरिक हालचालींसह संतुलित जीवनशैलीचे पालन करतात, धूम्रपान आणि मद्यपान टाळतात त्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी होते. या कर्करोगामुळे स्तनाच्या ऊतीमध्ये गाठ, स्तनाचा आकार बदलणे, स्तनाग्र उलट्या दिशेने वळणे, स्तनाग्रातून स्त्राव होणे यांसारखी लक्षणे दिसतात. नवजात बाळ तसेच आईच्या आरोग्यासाठी स्तनपान अतिशय आवश्यक आहे. स्तनपानाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
बाळ आणि आईचे रक्षण
आई आणि बाळ दोघांच्याही रक्षणासाठी
अंकुरा हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट म्हणाले की, स्तनपानामुळे बाळ आणि आई दोघांचेही विविध आजारांपासून संरक्षण होते. ज्या मातांनी बाळाला स्तनपान दिले आहे, त्यांनी कमीत कमी सहा महिने बाळाला न चुकता स्तनपान केल्याने रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी झाला आहे.
हेदेखील वाचा – Breast Cancer होऊ शकतो पूर्ण बरा, या पद्धतीने करा स्वतःची तपासणी
धोका कमी
स्तनपान करूनही एखाद्या स्त्रीला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. तर स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका मात्र कमी होतो. म्हणून, प्रत्येक स्त्रीला तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपानाचा सल्ला दिला जातो. जर स्त्रीला आईच्या दुधाचा पुरवठा कमी असेल तर ती ब्रेस्ट पंप वापरू शकते आणि बाळाला पुरेसा दूध पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्तनपान विशेष तज्ज्ञाची मदत घेऊ शकते.