फोटो सौजन्य - Social Media
किस करणं हे प्रेम व्यक्त करण्याचं एक सुंदर माध्यम असलं, तरी यामधून काही गंभीर आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहज पसरू शकतात. आपल्या तोंडातील लाळेमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि जीवाणू असतात. विशेषतः जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमी असते, तेव्हा हे अधिक धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे काही लोकांनी पार्टनरला किस करताना अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.
किसमुळे सर्वात सामान्यपणे दिसणारा आजार म्हणजे हर्पीस. हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे जो तोंडावर किंवा ओठांवर लहान फोडं निर्माण करतो. विशेष बाब म्हणजे, संक्रमित व्यक्तीला काही वेळा लक्षणं नसतात, त्यामुळे ओळखणं कठीण जातं. यासोबतच मोनोन्यूक्लिओसिस नावाचा संसर्ग होण्याचीही शक्यता असते, जो Epstein-Barr virus मुळे होतो. या आजारात ताप, गळ्याचं दुखणं, थकवा आणि गाठींमध्ये सूज अशी लक्षणं दिसतात. किसमुळे फ्लू किंवा कोरोना व्हायरससारखे श्वसनाचे आजारही पसरू शकतात, विशेषतः एखाद्या व्यक्तीला आधीच सर्दी-खोकला असेल, तर त्याच्याशी किस करणं टाळावं.
तोंडातले इन्फेक्शन, जसे की जिन्जिवाइटिस, देखील किसमुळे होऊ शकतात. यामध्ये हिरड्यांना सूज येते, दुर्गंधी निर्माण होते, आणि ओरल हायजिन खराब असल्यास हे अधिक वाढते. काही संशोधनानुसार हेपेटायटिस बी सुद्धा लाळेमार्फत पसरू शकतो, जरी तो फारसा सामान्य नसला, तरी धोका असतोच.
या सर्व गोष्टी लक्षात घेता, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, जसे की वृद्ध, लहान मुले, कॅन्सर किंवा HIV ग्रस्त रुग्ण, त्यांनी किस करणं शक्यतो टाळावं. याशिवाय, ज्यांना वारंवार तोंडात छाले किंवा संसर्ग होतो, त्यांनीही खबरदारी घ्यावी. अगदी सामान्य सर्दी-खोकल्याच्याही वेळी, दुसऱ्याला किस करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. प्रेमात आपुलकी जपणं जितकं गरजेचं आहे, तितकंच आरोग्याचं भान ठेवणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे किस करताना योग्य काळजी घेणं हे आपल्या आणि आपल्या पार्टनरच्या दीर्घकाळच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक ठरतं.