
फोटो सौजन्य - Social Media
आपले इम्यून सिस्टम म्हणजे शरीराचे सुरक्षाकवच, जे गंभीर आणि धोकादायक आजारांपासून बचाव करते. जर आपल्या शरीराची इम्युनिटी मजबूत असेल, तर आजार जवळपास येत नाहीत, परंतु सध्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे इम्यून सिस्टम कमकुवत होत आहे. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा शरीर काही विशिष्ट लक्षणे दाखवते, ज्याकडे वेळेत लक्ष दिल्यास आपण इम्युनिटी सुधारू शकतो.
वारंवार सर्दी-खोकला किंवा ताप येणे हे कमजोर इम्युनिटीचे प्रमुख लक्षण असू शकते. ऋतू बदलताना सर्दी होणे हे सामान्य असले तरी, सामान्यतः ७ ते १० दिवसांत ही समस्या बरी होते. कारण रोगप्रतिकारशक्तीला अँटीबॉडी तयार करण्यासाठी काही दिवस लागतात. मात्र, जर कोणाला वारंवार सर्दी-खोकला होत असेल आणि ती लवकर बरी होत नसेल, तर याचा अर्थ शरीराच्या संरक्षण यंत्रणेत कमतरता आहे. तसेच, वारंवार पोट बिघडणे किंवा पचनतंत्राशी संबंधित समस्या असणे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण आहे. नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, आपल्या इम्यूनिटीपैकी ७०% भाग हा पचनतंत्रावर अवलंबून असतो. कारण तिथे असलेले चांगले बॅक्टेरिया शरीराला संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात. जर सतत पोटदुखी, डायरिया किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर हे इम्यून सिस्टम कमकुवत असल्याचे संकेत असू शकतात.
तसेच, वारंवार कानात संसर्ग होणे किंवा न्यूमोनिया होणे हे देखील एक गंभीर लक्षण आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ अलर्जी, Asthma आणि इम्युनोलॉजीच्या मते, जर वर्षभरात ४ पेक्षा जास्त वेळा कानाला संसर्ग होत असेल किंवा दोनदा न्यूमोनियाची लागण झाली असेल, तर ही इम्यून सिस्टम कमकुवत असल्याची खूण असू शकते. याशिवाय, जखमा उशिराने भरून येणे हे देखील एक मोठे लक्षण आहे. शरीरावर कुठेही कट, जखम किंवा भाजल्यास त्वचा लगेच नवीन पेशी तयार करण्यास सुरुवात करते, परंतु जर जखम भरायला जास्त वेळ लागत असेल, तर याचा अर्थ शरीराची पुनरुत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी आहे.
शेवटी, दीर्घकाळ तणावात राहणे देखील इम्यून सिस्टमवर परिणाम करू शकते. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या मते, जास्त तणाव असल्यास लिम्फोसाइट्स (WBC) कमी होतात, जे संसर्गाशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे दीर्घकाळ तणाव राहणे म्हणजे कमकुवत रोगप्रतिकारशक्तीचे लक्षण असू शकते. अशा संकेतांकडे वेळीच लक्ष दिल्यास इम्युनिटी सुधारता येईल आणि आजारांपासून बचाव करता येईल.