
फोटो सौजन्य - Social Media
लसूण हा आपल्या रोजच्या जेवणातील एक आवश्यक घटक आहे. कोणतीही भाजी, आमटी किंवा फोडणी लावायची म्हटलं की लसूण अपरिहार्य असतो. पण सध्या बाजारात लसूणाचे दर वाढल्याने अनेकांना तो महाग पडतो. मात्र हा लसूण आपण घरच्या घरी अगदी सहज कुंडीत उगवू शकतो. टेरेस, गच्ची किंवा बाल्कनीत छोटीशी कुंडी ठेवली तरी लसूण सुंदर वाढतो. त्यासाठी फारसा वेळही लागत नाही. साधारण एक तास काढला तरी तुम्ही उत्तम लसूण लागवड सुरू करू शकता.
लसूण लावण्यासाठी सर्वप्रथम एक रुंद कुंडी किंवा प्लास्टिकची पोट तयार ठेवा. कुंडी नसेल तर घरात वापरल्या जाणाऱ्या फ्लॉवर पोटांचाही उपयोग करून चालतो. पोट्याला दुमडून त्याला थोडासा कडक आकार द्या. आता त्याच्या तळाशी स्वयंपाकघरातील जैविक कचरा फळांच्या साली, भाज्यांचे तुकडे आणि सुकलेली पाने भरा. हा कचरा काही दिवसांत विघटित होऊन मातीत नैसर्गिक खत तयार करतो आणि लसणाच्या रोपाला उत्तम पोषण मिळते.
लसूण चांगला वाढण्यासाठी भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक आहे. माती तयार करताना त्यात शेणखत, सुकलेल्या पानांचा चुरा आणि घरातील टाकाऊ कचऱ्याचे खत मिसळा. हे मिश्रण हलके, सैल आणि पाणी न साचणारे बनते. माती खूप घट्ट असेल तर लसणाचे मूळ व्यवस्थित पसरत नाही व उत्पादन घटते.
लसणाच्या लागवडीसाठी पाकळ्यांची योग्य तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लसणाच्या गाठी फोडून पाकळ्या वेगळ्या करा, पण त्यांची साल काढू नका. तसेच पाकळीचा खालचा मूळ भाग सुरक्षित ठेवा. याच भागातून नवीन कोंब बाहेर येतो. केवळ दोन-तीन लसणाच्या गाठी लावल्या तरी काही महिन्यांत एक किलोपेक्षा जास्त लसूण मिळू शकतो.
पाकळ्या लावताना मूळ असलेला भाग खाली आणि टोकदार भाग वर ठेवावा. पाकळीचा वरचा भाग मातीतून थोडा बाहेर दिसला तरी हरकत नाही. पाकळ्यांमध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून वाढताना त्यांना पुरेशी जागा मिळेल. लागवड झाल्यावर त्यावर हलकी भुसभुशीत माती घाला आणि हलक्या हाताने दाबून सेट करा.
लसूण वाढवण्यासाठी खूप सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. माती नेहमी किंचित ओलसर ठेवावी. माती जास्त ओली राहिली तर पाकळ्या कुजण्याचा धोका असतो, आणि अगदी कोरडी झाली तर वाढ थांबते. त्यामुळे पाणी फक्त आवश्यकतेनुसारच द्यावे. घरच्या घरी अशा प्रकारे लसूण उगवणे अत्यंत सोपे, किफायतशीर आणि रासायनिक खतांपासून मुक्त असल्यामुळे आरोग्यासही फायदेशीर ठरते.