फोटो सौजन्य - Social Media
कोकणातील रावडे घाट… कोकणातील लोकांना माहिताच आहे, दाट जंगलांनी वेढलेला, वळणावळणाचा आणि रात्रीच्या वेळी अंगावर काटा आणणारा हा घाट! आसपास माणसाचे गाव नाही, दवाखानाही नाही. काही आपत्कालीन झालं, तर रत्नागिरी शहरापर्यंत किमान तासभर प्रवास करावा लागतो. (Horror Story)
त्या रात्री साडेबारा वाजता रोहन त्याची अँब्युलन्स घेऊन घाटातून येत होता. काळोख इतका दाट होता की फक्त अँब्युलन्सच्या दिव्यांनी दिसेल तेवढाच रस्ता त्याला कळत होता. अचानक धाड! त्याने ब्रेक ठोकले. समोर एक माणूस पूर्ण रक्तात माखलेला, जवळजवळ मृत अवस्थेत पडलेला! बाजूला त्याची दुचाकी चिरडून गेलेली. रोहन धावत गेला, तो अजून जिवंत होता. हलक्या श्वासात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. रोहनने वेळ न दवडता त्याला उचलून अँब्युलन्समध्ये ठेवले आणि वेगाने रत्नागिरीकडे गाडी वळवली. (Kokan)
घाट उतरून काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती अँब्युलन्सला हात दाखवत उभा. त्या परिसरात हॉस्पिटल नसल्यामुळे अशा वेळी लोक अँब्युलन्सलाच हात दाखवतात. रोहनने विचार न करता गाडी थांबवली. तो व्यक्ती गाडीत बसला आणि म्हणाला, “ट्रकने धडक दिली… डोक्याला लागलं… हातही नीट हालत नाही.” पण रोहनच्या लक्षात आलं — तो जिथे उभा होता, तिथे कुठेही दुचाकी नव्हती, स्किडचा खुणा नव्हत्या.
मात्र मागचा जखमी माणूस मरणाशी झुंजत असल्याने रोहनने त्या शंकेकडे दुर्लक्ष केले. तासभर झाला… मग दीड तास. पण रत्नागिरी अजूनही दिसत नव्हतं. दरम्यान अचानक तो व्यक्ती म्हणाला, “गाडी कडेला लावा.” रोहन घाईत असला तरी त्याने गाडी बाजूला घेतली. तो व्यक्ती शांतपणे खाली उतरला. रोहनने विचारलं, “कुठे जाताय?” पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला आणि आजूबाजूला पाहिलं… आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. ती तीच जागा होती, अगदी तीच! जिथे त्याने त्या व्यक्तीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती.
रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. देवाचं नाम घेत त्याने वेगात गाडी पुढे हाकली. पुढचा प्रवास फक्त अर्ध्या तासात संपला आणि अँब्युलन्स हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. पण आतला जखमी तोपर्यंत मृत झाला होता. कर्मचाऱ्यांनी मृतदेह नेला. रोहन गाडी बंद करणार इतक्यात त्याच्या नजरेस मागच्या बाजूला एक वॉलेट दिसलं. कुतूहलाने तो उघडतो… आत फोटो होता आणि फोटो पाहताच त्याच्या हातून वॉलेट खाली पडला. कारण त्यात फोटो होता त्या जखमी व्यक्तीचा! आणि हा तोच माणूस होता, जो रोहनसोबत रावडे घाटाच्या खाली लिफ्ट मागून बसला होता. हा तोच माणूस होता, जो अर्ध्या रस्त्यात अँब्युलन्समधून उतरून काहीही न उत्तर देता निघून गेला.






