फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः महिला, ज्या घर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे सामान्य झाले आहे. पण हे दुर्लक्ष कधी कधी गंभीर आजाराचे कारण ठरू शकते, त्यापैकीच एक म्हणजे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer). भारतामध्येही गेल्या काही वर्षांत या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
चला जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्ट लीमा महाजन यांच्या मते स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी उपयुक्त ६ अन्नपदार्थांविषयी:
डाळिंब (Pomegranate):
डाळिंब केवळ स्वादिष्ट फळ नाही, तर ते अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यात एलॅगिटॅनिन्स नावाचे घटक असतात जे कर्करोग पेशींची वाढ थांबवतात आणि शरीरातील *एस्ट्रोजेन*चे प्रमाण संतुलित ठेवतात.
क्रूसीफेरस भाज्या (Cruciferous Vegetables):
ब्रोकली, फुलकोबी, पत्ता कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये सल्फोराफेन नावाचे घटक असतात, जे कर्करोगविरोधी असून शरीरातील सूज आणि विषारी घटक कमी करतात.
सोया आणि डाळी (Soy & Lentils):
सोयाबीन, टोफू आणि डाळी प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. यात आइसोफ्लेवोन्स असतात जे एस्ट्रोजेनचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. नियमितपणे सोया पदार्थ खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो.
आवळा आणि पेरू (Amla & Guava):
हे दोन्ही फळे व्हिटॅमिन C ने भरलेली आहेत. व्हिटॅमिन C शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पेरूमध्ये असणारे लायकोपीन कर्करोगाविरुद्ध लढण्यास मदत करते.
ऑलिव्ह तेल (Olive Oil):
स्वयंपाकासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर करा. यात असणारा ओलेओकॅन्थॉल हा घटक कर्करोग पेशी नष्ट करण्यात मदत करतो आणि शरीरातील सूज कमी करतो.
अळशीचे बी (Flaxseeds):
अळशीच्या बियांमध्ये लिग्नॅन्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स असतात. हे घटक हार्मोनसंबंधी कर्करोग, विशेषतः स्तनाचा कर्करोग, टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही हे दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता.
थोडेसे आहारातील बदल आणि आरोग्याची काळजी, एवढ्यानेच आपण या गंभीर आजारापासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.