फोटो सौजन्य - Social Media
गणेशचतुर्थीचा सण जवळ आहे. या सणामध्ये राज्यात प्रत्येक ठिकाणी एक अनोखा जल्लोष पहिला जातो. या सणादरम्यान राज्यातील घराघरात पंच पक्वान्न बनवले जातात. गोडाचा बेत केला जातो. गणपतीला प्रिय असणारे सर्व पदार्थ आवर्जून बनवले जातात. बाप्पाला त्याच्या आवडत्या खाद्य पदार्थांचा नैवैद्य दिला जातो. खासकरून मोदकाचा बेत घराघरात असतो. त्याचबरोबर अनेक खाद्य पदार्थ स्वयंपाक घरामध्ये शिजत असतात. एकंदरीत, गणेशचतुर्थी पासून ते अनंत चतुर्थीच्या दिवसांपर्यंत बाप्पाला विविध प्रकारचे भोग बनवले जातात. यामध्ये घरातल्या सगळ्यांचीच मज्जा असते. लहान मुलांच्या उत्साह तर पाहण्यासारखा असतो.
हे देखील वाचा : डाळ-तांदळापासून नाही तर पोह्यापासून बनवा झटपट स्वादिष्ट इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी
मोदकाव्यतिरिक्त इतर खाद्य पदार्थही आहेत जे गणपती बाप्पाला आवडतात. यामध्ये कुरमुऱ्याचे लाडूंचाही समावेश आहे. आपण सगळ्यांनी कधीना कधी कुरमुऱ्याचे लाडू खाल्ले असतील. पूर्वी, बहुतेक मराठी शाळांमध्ये शनिवारी कुरमुऱ्याचे लाडू वाटले जात असत. अनेकांना कुरमुऱ्याचे लाडू हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटले असेल. चला तर मग आज जाणून घेऊयात कुरमुऱ्याचे लाडू बनवण्याची रेसिपी:
साहित्य :
२ कप कुरमुरे
१ कप किसलेले खोबरे
¾ कप गूळ, किसलेला
¼ कप चिरलेला काजू (काजू, बदाम आणि पिस्ता)
१ टीस्पून वेलची पावडर
२ चमचे तूप
२ चमचे पाणी
कृती:
प्रथम, एका मोठ्या कढईत २ चमचे तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला गूळ घाला. गूळ हळूहळू वितळू द्या आणि त्यात २ चमचे पाणी घाला. गुळाची एकसारखी पाक तयार होईपर्यंत गॅसवर मध्यम आचेवर ढवळा. पाक तयार आहे का ते बघण्यासाठी, एका थोड्याशा पाण्यात गुळाचा थेंब टाका. जर तो थेंब गोळा झाला तर पाक तयार आहे. पाक तयार झाल्यावर त्यात कुरमुरे, किसलेले खोबरे, चिरलेले सुके मेवे (काजू, बदाम, पिस्ता) आणि वेलची पावडर घाला. सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्या, पण जास्त थंड होऊ देऊ नका कारण ते कठीण होऊ शकते.
मिश्रण हाताळण्याजोगं झाल्यावर हाताला तूप लावा आणि लहान-लहान गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याला गोलाकार आकार द्या आणि व्यवस्थित दाबून लाडू तयार करा.