Heart Attack Symptoms In Women
हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. परंतु, महिलांनाही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. मात्र त्यांची लक्षणे अनेकदा पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात. त्यामुळे अचानक जाणवणारा थकवा, मळमळ, अपचन, चक्कर, श्वास घेण्यास त्रास किंवा अस्वस्थता याकडे सामान्य आजार किंवा गॅस-अॅसिडिटी म्हणून दुर्लक्ष केले जाते. काही वेळा ही लक्षणे सौम्य असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. मात्र हृदयविकाराच्या झटक्यात उपचारासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. विशेषतः सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणे खूप सौम्य असू शकतात किंवा लक्षातही येत नाहीत. त्यामुळे शरीरात अचानक किंवा असामान्य बदल जाणवल्यास त्याकडे लक्ष देणे आणि आवश्यक असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कोणती वेगळी लक्षणे दिसतात, जाणून घेऊयात.
शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
महिलांमध्येही छातीच्या मध्यभागी दाब, जडपणा, किंवा वेदना होणे हे हृदयविकाराचे महत्त्वाचे संकेत आहेत. सतत किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या छातीतील अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू नये.
छातीत वेदना नसतानाही अचानक धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे अशा त्रासाकडे केवळ थकवा म्हणून पाहू नये.
नेहमीच्या कामानंतर होणाऱ्या थकव्यापेक्षा वेगळा, अचानक किंवा असामान्य स्वरूपाचा थकवा जाणवणे हे महिलांमध्ये दिसणारे धोक्याचे लक्षण असू शकते. काही वेळा हा संकेत इतर लक्षणांपेक्षा आधीही जाणवू शकतो.
मळमळ, उलट्या, अपचन किंवा पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता यांसारखी लक्षणेही हृदयविकाराच्या झटकाच्या वेळी दिसू शकतात. त्यामुळे वारंवार किंवा अचानक अशी लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अनेकदा याकडे गॅस किंवा अपचन समजून दुर्लक्ष केले जाते.
हार्ट अटॅकचा त्रास केवळ छातीपुरता मर्यादित नसतो. एका किंवा दोन्ही हातांसह पाठ, मान, खांदा किंवा जबड्यात वेदना जाणवत असेल तर हे देखील महत्वाचे लक्षण आहे.
अचानक चक्कर येणे, अशक्तपणा किंवा थंड घाम येणे ही देखील धोक्याची लक्षणे असू शकतात.
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणे सौम्य असल्याने व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचे कळू शकत नाही. काही प्रकरणांत नंतर ईसीजी किंवा इमेजिंग तपासणीदरम्यान त्याचे निदान होते.
अचानक छातीत अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास, थंड घाम, मळमळ, चक्कर किंवा शरीराच्या वरच्या भागात वेदना यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. हृदयविकाराचा झटक्याची कोणतीही लक्षणे दिसत असल्यास असल्यास स्वतः निदान करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम






