
फोटो सौजन्य - Social Media
राजेश आणि राणी नुकतेच शहराच्या टोकाला असलेल्या एका जुन्या वसाहतीत त्यांच्या नव्या घरात राहायला आले होते. घर स्वस्त मिळालं होतं, पण आसपास एक विचित्र शांतता पसरलेली होती. पहिल्या काही दिवसांत सगळं सुरळीत होतं. मात्र एका रात्रीपासून सगळंच बदलू लागलं. त्या रात्री अर्ध्या झोपेत राजेशला अचानक राणीची किंकाळी ऐकू आली. तो दचकून उठला. दिवा लावून पाहतो, तर राणी शांतपणे झोपलेली. “स्वप्न असेल,” असं समजून तो परत झोपायचा प्रयत्न करतो. पण काही मिनिटांतच पुन्हा तीच किंकाळी. यावेळी आवाज अधिक तीव्र होता.
राजेश उठून राणीकडे पाहतो. तिचे डोळे घट्ट मिटलेले, चेहरा पांढराफटक. अचानक ती स्वतःहून डाव्या बाजूला सरकू लागते. राजेश काही समजायच्या आतच राणी जोरात भिंतीवर आपटते. धडाम! आवाज संपूर्ण घरात घुमतो. त्या धक्क्याने तिची झोप उघडते. ती थरथरत राजेशकडे धाव घेते आणि घट्ट मिठी मारून रडू लागते. “काहीतरी होतंय… मला भीती वाटतेय,” राणी रडत म्हणते. राजेश शब्दावाचून स्तब्ध होतो. त्याने जे पाहिलं, त्यावर विश्वास बसत नव्हता. दोघेही रात्रभर जागेच राहतात.
सकाळी निर्णय होतो. गावाकडे जायचं. राणी गरोदर असल्यामुळे राजेश अधिकच काळजीत होता. गावात पोहोचताच ते एका प्रसिद्ध तांत्रिकाकडे जातात. तांत्रिक राणीकडे पाहताच गंभीर होतो. काही क्षण डोळे मिटून मंत्र पुटपुटतो आणि अचानक म्हणतो, “हिच्या अंगात तिची काकी आहे.” राजेश हादरतो. तांत्रिक सांगतो की राणीची काकी गर्भावस्थेतच मरण पावली होती. अपूर्ण इच्छा आणि मत्सरामुळे तिचं सावट राणीवर आलं आहे. राणीही गरोदर असल्यामुळे ते सावट अधिक बलवान झालं आहे.
उपाय म्हणून तांत्रिक एकच गोष्ट सांगतो “आजच, सूर्यास्तानंतर, तिच्या काकीच्या नावाने गावच्या स्मशानात कोंबड्याचा बळी द्या.” त्या रात्री राजेशचे आणि राणीचे आईवडील सगळे स्मशानात जातात. आजूबाजूला दाट अंधार, वाऱ्याच्या झुळुकीत झाडांची सळसळ. विधी पूर्ण होतो. बळी दिल्यानंतर सगळे परत फिरतात.
तेवढ्यात मागून एक विचित्र आवाज… “श्श्श…” राणीच्या आईच्या अंगावर काटा उभा राहतो. कुणी तरी मागे असल्याची जाणीव होते. पण राणीचे वडील थंड आवाजात म्हणतात, “कोणीही मागे वळून पाहू नका… चालत राहा.” कोणीही मागे पाहत नाही. ते थेट घराकडे निघून जातात. त्या दिवसापासून राणीवरचं सावट दूर झालं. किंकाळ्या थांबल्या. रात्री शांत झोप येऊ लागली. पण राजेश आजही कधी कधी झोपेतून दचकून उठतो… कारण त्याच्या कानात अजूनही तो आवाज घुमत असतो “श्श्श…”
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)