फोटो सौजन्य - Social Media
रायगडच्या माणगावात मोर्बे गावात सलीम शिरेकर नावाचा गृहस्थ कामानिमित्त बाहेरगावी जात असायचा. त्यावेळी त्याच्या घरी त्याची बायको रुबी शिरेकर, घरी एकटी असायची. सलीम तसा आधी एकटा राहायचा. नुकतेच दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या एका महिन्यानंतर, सलीमला महत्वाच्या कामासाठी सौदीला बोलवण्यात आले होते. घर तसे मोठे होते. त्या घरात फक्त दोघेच राहत होते. अशात सलीमला कामानिमित्त लगेच बोलवल्यामुळे रुबी घरी एकटी राहिली.
पहिला आठवडा तिच्यासाठी फार भयंकर गेला. त्यात असा अनुभव तिला मिळाला जो तिच्यासाठी फार नवीन होता. संध्याकाळचे ९ वाजले की दररोज कुणी तरी तिच्या घरावर दगडे मारत असे, आधीचे दोन दिवस तिने फारसे लक्ष दिले नाही. तिला वाटले की गावातले पोरं असतील, छेडछाड करण्यासाठी मुद्दाम घरावर दगडे मारत असतील. पण दररोज सारख्या वेळी सारखी गोष्ट घडते, हे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने एकेदिवशी, दगड घरी येताच, घराच्या बाहेर खिडकीतून पहिले. तिला एका माणसाची आकृती जाणवली. पण भयानक म्हणजे त्या आकृतीला धड नव्हते. फक्त पाय आणि वर मान!
ती त्या रात्री फार घाबरली. त्यानंतरच्या रात्रीही तोच प्रकार घडला, जो गेला आठवडाभर घडत होता. घरात दगड आला. तो दगड तिने निरखून पाहिला. दगडावर रक्त लागलं होतं, ते ही ताज! या परिस्थिती एक बाब तिच्या लक्षात आली. दररोज घरामध्ये येणाऱ्या दगडाचा आकार, दगडाचा रंग सारखाच आहे, जणू एकच दगड दररोज फेकला जात असावा. त्या रात्री तर ती आकृती तिला अगदी तिच्या नजीकच सापडली. या रात्री रुबी इतकी घाबरली होती की तो प्रसंग घडताच, रुबी शेजारच्या हसीना दिगरकर काकूंच्या घरी पोहचली.
हसीना काकू रुबीची अवस्था पाहून “काय घडले असावे?” हे ओळखून गेली होती, कारण हसीना काकुंसोबतदेखील हीच घटना आधी घडली होती, जेव्हा ते सासुरवास अनुभवण्यासाठी आले होते. हसीना काकूंनी तिला विचारले, “बुटक्या… तुला पण दिसला वाटतं. पण बाय, घाबरू नकोस! आज हवं तर इथेच थांब, उद्या दगड आली की जेवढ्या पाठ आहेत, तेवढ्या शिव्या घाल.” त्या रात्री रुबी हसीना काकूंकडे झोपी गेली.
त्यानंतरच्या रात्री साडे ९ च्या सुमारास. पुन्हा दगड आली. रुबी हिम्मत करून खिडकीच्या इथे धावत गेली. दूरवर तिला ती आकृती दिसली. रुबीने कसलाही विचार न करता. त्या आकृतीला जोरजोरात शिव्या घातल्या. अगदी चार ते पाच शिव्या ऐकून, ती आकृती नाहीशी झाली. रुबीच्या जीवात जीव आला. तिला वाटलं उद्या पण हेच घडलं तर आणखीन शिव्या घालू. पण तिला त्या गोष्टीची जराही गरज पडली नाही, कारण त्या दिवसानंतर ती आकृती तिला कधीच दिसली नाही.
ही घटना वाचकांनी सांगितलेला अनुभव असून या घटनेवर आमचा कोणताही दावा नाही.