फोटो सौजन्य - Social Media
भयाण रात्र होती. मुलुंड कॉलनीमध्ये तशी रात्रीची गर्दळ फार असते. पण त्या रात्री फार कुणी भटकत नव्हतं. मी ओमकार, एकटाच! कंटाळा आला म्हणून जरा बाहेर फेरफटका मारून येऊ, असं ठरवलं. घरी सगळे गाढ झोपेत होते. रात्रीचे जवळजवळ 12.30 ते 1 च्या दरम्यान घड्याळाचा काटा दिसत होता. घराबाहेर आलो आणि बाहेर पाहतो तर काय भयाण शांतता आणि काळोखी रात्र!
मुंबई म्हणलं तर वर्दळ आलीच पण या रात्री साधं मांजरूही बाहेर फिरकताना दिसत नव्हतं. मला तर झोप नव्हतीच मुळात म्हणून मी बाहेर फेरफटका मारण्याचं ठरवलंच होतं, वातावरण जरी भयाण वाटत असलं तरी बाहेर आलोच आहे तर घरी परतण्यापेक्षा फेरफटका मारूनच येऊ. रस्त्यावरून चालत होतो. रस्त्यावर फार काही गाड्याही नव्हत्या. हायवेला एक प्रसिद्ध वडापाव वाला आहे, तो मध्यरात्रीही सुरू असतो. हायवेवरच्या दुरून येणाऱ्या गाड्या या तिथेच नाश्त्यासाठी थांबत असतात. मी म्हटलं, चला बाहेर आलोच आहोत तर पोटाला जरा सुख देऊ. आता याच वाटेने गेलो तर खूप वेळ जाईल म्हणून मी शॉर्टकट मारून हायवेवर जाण्याचा बेत आखला.
आमच्या येथून हायवेला जाण्यासाठी मध्ये पाइपलाइनच्या शेजारी काही चाळी आहेत. त्या गल्लीगोळातून जात-जात मस्त वडापाव किंवा इतर खाण्याचा आस्वाद घेईल असं मी ठरवलं. चालता चालता त्या पाइपलाइनच्या शेजारी असणाऱ्या चाळीत येऊन पोहचलो. गल्ली तशी फार लहान! पूर्ण अंधार पसरलेल्या त्या भागात छम-छम बांगड्यांचा आवाज येत होता. जसं जसा मी जवळ गेलो तसं तसा तो आवाज वाढू लागला. क्षणार्धात मी स्तब्ध झालो. तिथे चार स्त्रिया रिंगण करून नाचत होत्या. चौघींनी काळया रंगाची साडी परिधान केली होती. मी स्तब्ध वेडा प्रश्नांच्या पुरात वाहून गेलो. घामाने भिजलेला मी ते पाहून काही मिनिटांसाठी जागीच ताठ उभा झालो. त्या स्त्रिया मात्र त्याचं ते रिंगण घालून स्वत:च्या धुदिंत नाचत होत्या. माझ्याकडे मात्र त्याचं लक्ष देखील नव्हतं.
काळोख्या भागात त्या स्त्रिया नाचत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त त्या भागात फक्त मी होतो. तरी त्यांच्या बाजूने वाट काढत मी पुढे गेलो. जसा पुढे गेलो तसा आवाज थांबला. पण मी काही मागे पाहिलं नाही. चालत चालत मी हायवेवर आलो. हायवेवर वडापावचे दुकान बंद होते. एकही गाड्या त्या भल्या मोठ्या हायवेवर दिसत नव्हती, हा प्रसंग असा होता की जणू मी माझ्या जगात नाही, कुठे भलतीकडेच आल्याचा भास मला जाणवत होता.
माझ्यासोबत घडतय तरी काय? याचा सुगावा तर मला काहीच लागेना. पण त्या नाचणाऱ्या बाया कोण? याचा उत्तर शोधण्यासाठी मी घराकडे परतीच्या त्याच वाटेने मार्गस्थ झालो. पुन्हा त्या गल्लीमध्ये येऊन पोहचलो. भयाण शांतता आणि भयाण काळोख! पण यावेळी तिथे त्या नाचणाऱ्या बाया नव्हत्या. त्या गल्लीत फक्त नि फक्त मी एकटा होतो. कुणी नसल्याने माझ्या जीवात जीव तर आला होता म्हणून मी गल्ली चालण्यास सुरुवात केली. जसा मी गल्लीच्या त्या टोकाला पोहचलो माझ्या मागे पुन्हा त्या बांगड्यांचा आक्रोश जाणवू लागला. मी वळून मागे पाहिले. तिथे त्या चार बाया रिंगण करून नाचताना मला पुन्हा दिसल्या. मी तशाच दम टाकून घराकडे पळालो. त्या दिवसानंतर मी त्या वाटेला दिवसाही सहसा फिरकत नाही. आजही तो प्रसंग आठवला की माझ्या हृदयात धडकी भरते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)