फोटो सौजन्य - Social Media
गांजा हा कनेबीस वनस्पतीपासून तयार होणारा नशिला पदार्थ आहे. यात प्रामुख्याने दोन प्रकारची रसायने असतात: टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल (THC) आणि कॅनाबिडिओल (CBD). THC नशा वाढवण्याचे काम करते, तर CBD नशा कमी करण्यासाठी कार्यरत असते. गांजाचा वापर काही देशांमध्ये बंदी असतानाही बेकायदेशीर पद्धतीने सुरू असतो. गांजाचे सेवन सिगारेटसारखे ओढून केले जाते.
गांजामधील THC रसायन शरीराच्या पेशींमध्ये पोहोचून विविध अवयवांवर परिणाम करते. यकृत त्याचे चयापचय करून ११-हायड्रॉक्सी-THC आणि कार्बोक्सी-THC या घटकांमध्ये रूपांतरित करते. त्यापैकी काही उत्सर्जित होते, तर उर्वरित शरीरात साठून राहते. वेळोवेळी हे रसायन रक्ताभिसरणात परत सोडले जाते, ज्यामुळे मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतो. जेव्हा THC शरीरात जास्त प्रमाणात साचतो, तेव्हा तो मेंदूपर्यंत पोहोचून न्यूरॉन्सच्या कार्यावर विपरित परिणाम करतो. त्यामुळे व्यक्तीला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण होते.
संशोधनानुसार गांजाच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे मानसिक व शारीरिक धोके संभवतात. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनिअरिंग अँड मेडिसिनच्या अहवालानुसार गांजा बायपोलर डिसऑर्डरला उत्तेजन देतो, ज्यामुळे डिप्रेशन आणि इतर मानसिक समस्यांमध्ये वाढ होण्याचा धोका निर्माण होतो. काही प्रकरणांमध्ये गांजाच्या अतिसेवनामुळे व्यक्तीची निर्णयक्षमता कमी होऊन चिंता आणि भ्रमावस्था देखील निर्माण होऊ शकते. याशिवाय, दीर्घकाळ गांजाचे सेवन करणार्यांमध्ये आठवण शक्ती कमी होणे आणि सर्जनशील विचार प्रक्रियेत अडथळा येणे यासारखे परिणाम दिसून येतात.
याचबरोबर काही संशोधनांमध्ये असेही स्पष्ट झाले आहे की गांजाच्या दीर्घकालीन सेवनामुळे टेस्टिक्युलर कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जरी या बाबतीत अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता असली तरी प्रारंभिक संशोधनात हा धोका लक्षात घेण्यासारखा आहे. शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये फुफ्फुसांवर होणारे गंभीर परिणाम महत्त्वाचे आहेत. नियमित गांजाचे सेवन केल्यास फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो आणि श्वसनमार्ग कमकुवत होतो. यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (COPD) किंवा दम्याचा धोका वाढतो.
शिवाय, दीर्घकालीन गांजाच्या सेवनामुळे सतत खोकला आणि श्वसन कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गांजाच्या सेवनाबाबत जागरूकता वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे. गांजाचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम किती गंभीर होऊ शकतो हे लक्षात घेता त्याच्या अनियंत्रित वापराला आवर घालणे आवश्यक आहे.