आरोग्याच्या काळजीमध्ये नियमित रक्त चाचण्या खूप महत्वाच्या असतात, विशेषत: अशा पुरुषांसाठी जे स्वतःहून वैद्यकीय मदत घेण्याची शक्यता कमी असते. रक्त तपासणी करून आरोग्य कसे आहे ते समजते आणि त्यातून आरोग्यविषयक काही अडचणी असल्यास त्याची लक्षणे वेळेवर लक्षात येतात आणि त्यानुसार योग्य उपचार करून आरोग्याची काळजी घेणे शक्य होते.
नियमित रक्त चाचण्यांद्वारे तुमच्या आरोग्याविषयीची माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे, डॉ. अजय शाह, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांचा सल्ला तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. (फोटो सौजन्य – iStock) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य
रक्त तपासणी मध्ये, लो -डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल), हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) आणि ट्रायग्लिसराइड्ससह कोलेस्टेरॉलची पातळी, मोजता येते. एलडीएल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढणे किंवा एचडीएलची पातळी कमी झाल्याने हृदयरोग आणि स्ट्रोकसाठी होण्याची शक्यता वाढते. या पातळीवर लक्ष ठेऊन, जीवनशैलीमध्ये बदल करून किंवा औषधांद्वारे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांवर उपाय आणि त्यांचा प्रतिबंध करण्यास मदत होते.
रक्तदाब
ही प्रत्यक्ष रक्ताची चाचणी नसली तरी रक्त तपासणी बरोबरच रक्तदाबाची नियमित तपासणी केली जाते. उच्च रक्तदाब हा एक सायलंट किलर आहे, ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक होऊ शकतो आणि मूत्रपिंडाचे नुकसान होते. नियमित तपासणी केल्याने वेळेवर उपचार करणे शक्य होते
रक्तातील साखरेची पातळी
उपाशी पोटी केलेली रक्तचाचणी तसेच HbA1c चाचणी मध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण समजते, जेणेकरून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत होते आणि मधुमेहाचे निदान होऊन त्यावर उपाय करणे शक्य होते. तुम्ही प्रीडायबेटिक किंवा डायबेटिक आहात याचे निदान झाल्याने न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या अडचणीं टाळता येऊ शकतात
प्रोस्टेट हेल्थ
प्रोस्टेट – स्पेसिफीक अँटीजेन (पीएसए) चाचणी मध्ये रक्तातील पीएसए पातळी मोजली जाते, त्यामुळे प्रोस्टेटचे आरोग्य कसे आहे ते समजते. पीएसएची पातळी वाढलेली असल्यास प्रोस्टेट कर्करोग किंवा प्रोस्टेटशी संबंधित इतर विकार आहेत का हे लक्षात येण्यात मदत होऊन लवकर निदान होऊन अधिक प्रभावी उपचार पर्याय विचारात घेता येतात आणि वेळीच उपाययोजना करणे शक्य होते.
[read_also content=”Prostate Cancer | प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय आणि कशी करावी तपासणी? प्रत्येक पुरूषाला माहीत असायलाच हवे https://www.navarashtra.com/lifestyle/information-about-prostate-cancer-screening-types-in-marathi-547551/”]
यकृत आणि मूत्रपिंड कार्य
लिव्हर एंजाइम मोजणाऱ्या (उदा. एएलटी, एएसटी) आणि मूत्रपिंड कार्य (उदा. क्रिएटिनिन, बियूएन) तपासणाऱ्या रक्त चाचण्यांमध्ये यकृत रोग, मूत्रपिंड रोग किंवा त्यांचे कार्य बिघडण्याची सुरुवातीची चिन्हे समजतात. या चाचण्यांमध्ये औषधांचे होणारे परिणाम पाहता येतात आजार जास्त बळावण्याआधी त्याचे निदान होते.
हार्मोन्स लेव्हल्स
टेस्टोस्टेरॉनची पातळी वयानुसार नैसर्गिकरीत्या कमी होत जाते आणि त्याचा ऊर्जा, मूड आणि कामवासनेवर परिणाम होतो. रक्तचाचण्या टेस्टोस्टेरॉन आणि इतर हार्मोन्स पातळी मोजू शकतात, ज्याचा हायपोगोनॅडिझम किंवा एंड्रोजनची कमतरता यांसारख्या विकारांवर उपचार करण्यासाठी फायदा होतो.
कंप्लीट ब्लड काऊंट (सीबीसी)
सीबीसी मध्ये लाल आणि पांढऱ्या रक्त पेशी, हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स सारख्या रक्ताच्या विविध घटकांचे प्रमाण पाहता येते त्यातून तुमच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती मिळते. यामुळे अॅनिमिया, संक्रमण आणि रक्त विकार यासारख्या रोगांचे निदान करण्यास मदत होते.
व्हिटॅमिन आणि खनिज कमतरता
रक्त चाचणीमध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12 आणि लोह यासारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांमधील कमतरता आहे का हे समजते. उर्जा पातळी, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्य चांगले रहावे यासाठी या कमतरता दुर करणे महत्वाचे आहे.
इनफ्लेमेटरी मार्कर
सी – रिएक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) आणि एरिथ्रोसाइट सेन्डीमेशन रेट (ईएसआर) सारखे मार्कर शरीरातील संधिवात, हृदयरोग आणि कर्करोग यासारख्या तीव्र आजारांशी संबंधित सूज दर्शवतात. या चिन्हांवर लक्ष दिल्यास या विकारांचा प्रतिबंध आणि त्यावर उपाययोजना करण्यास मदत होते.
थायरॉईड फंक्शन
थायरॉईड हार्मोन्स चयापचय, उर्जा पातळी आणि एकूणच आरोग्याचे नियमन करतात. थायरॉईड फंक्शन (टीएसएच, टी 3, टी 4) मोजणाऱ्या रक्त चाचण्यांमध्ये हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम आहे का हे समजते, ज्यामुळे लवकर उपचार करणे शक्य होते.
नियमित रक्त चाचण्यांमुळे पुरुषांच्या आरोग्याविषयी माहिती मिळते, ज्यामुळे विविध आजारांचे वेळीच निदान होऊन उपाय करणे शक्य होते. निरोगी आणि दीर्घायुषी होण्यासाठी, पुरुषांना त्यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहून नियमितपणे रक्त चाचण्या करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.