Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीचा सण दरवर्षी भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यंदा 2025 ला 14 जानेवारीला यंदा मकर संक्रांत साजरा केला जाईल. मकर संक्रांती म्हणजेच उत्तरायण हा सण सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर येतो. भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि परंपरांनी ओळखला आणि साजरा केला जातो. महाराष्ट्रात तिळगुळाचे महत्त्व, पंजाबमध्ये लोहरी, तामिळनाडूमध्ये पोंगल, तर आसाममध्ये भोगाली बिहू या नावाने साजरा होणारा हा सण विविधतेने नटलेला आहे.
मात्र, भारताबाहेरही काही देशांमध्ये मकर संक्रांतीला अनोख्या पद्धतीने साजरे केले जाते. चला जाणून घेऊया मकर संक्रांती कशा पद्धतीने आणि कुठल्या नावाने परदेशात साजरी केली जाते. तर, मकर संक्रांती भारतासह, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका या देशांमध्ये साजारा करण्यात येतो.
पोंगल 2025 कधी आहे? कसा साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा
चला तर मग जाणून घेऊयात या देशांमध्ये कशाप्रकारे हा सण साजरा केला जातो.
श्रीलंका – उजहावर थिरानाल किंवा पोंगल
भारताच्या दक्षिणेला भागात असलेल्या श्रीलंकेतही मकर संक्रांती साजरी केली जाते. या देशात या सणाला “उजहावर थिरानाल” म्हणतात. विशेषतः तामिळ समाजात हा सण पोंगल नावाने ओळखला जातो. तांदळाच्या नवीन पिकाचे स्वागत करण्यासाठी आणि निसर्गाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीलंकन तामिळ समुदाय हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो. घराघरात गोड पदार्थ बनवले जातात आणि गायी-वासरांना सजवून त्यांची पूजा केली जाते.
म्यानमार – थिनाग्यान
तसेच, म्यानमारमध्ये देखील मकर संक्रांती “थिनाग्यान” नावाने ओळखली जाते. म्यानमारमध्ये हा हा उत्सव बौद्ध परंपरांशी जोडलेला आहे आणि नवीन वर्षाच्या आगमनाचा प्रतीक मानला जातो. म्यानमारमध्ये हा सण ३ ते ४ दिवस चालतो. या काळात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, धार्मिक विधी करतात आणि जलक्रीडा उत्सव साजरा करतात. या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या शिकवणीला मिळणारे महत्त्व.
थायलंड – सॉन्गकर्न
म्यानमान आणि श्रीलंकेशिवाय, थायलंडमध्येही मकर संक्रांती “सॉन्गकर्न” म्हणून ओळखण्यात येते. थायलंडमध्ये ‘हा’ सण पतंग उडवण्याच्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी थायलंडमधील राजे देवाला समर्पण म्हणून विशेष पतंग उडवत असत. याशिवाय, थायलंडमधील लोक या काळात पारंपरिक प्रार्थना करतात आणि भिक्षूंना अन्नदान करतात. हा सण समृद्धी, आनंद, आणि शांततेचे प्रतीक मानला जातो.
उत्सवांचे वैशिष्ट्य
भारताप्रमाणेच या देशांमध्येही मकर संक्रांतीचा सण ऋतू परिवर्तन, नवीन वर्षाचे स्वागत आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सांस्कृतिक विविधतेने नटलेला हा सण जगभरात मानवतेचा संदेश देतो. भारताबाहेरही या सणाचे महत्त्व त्याच्या प्राचीन परंपरांमध्ये जपले गेले आहे.