अनेकदा सकाळी नाश्त्याच्या वेळी नेमकं काय बनवायचा हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. सकाळच्या घाईगडबडीमध्ये सर्वच महिला झटपट होणारा पदार्थ बनवण्यासाठी जास्त प्राधान्य देतात. प्रत्येक घरामध्ये नाश्त्यासाठी उपमा, पोहे किंवा इडली हे पदार्थ जास्त बनवले जातात. पण तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अश्यावेळी तुम्हाला जर नाश्त्यासाठी कोणता वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही व्हेज ग्रिल सँडविच बनवू शकता. हा पदार्थ चवीला देखील छान लागतो. तसेच सँडविच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. सँडविचमध्ये भाज्या असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असते.
लहान मुलं अनेकदा भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात, अश्यावेळी तुम्ही त्यांना भाज्यांपासून सँडविच बनवून देऊ शकता. हे सँडविच आरोग्यासाठी तर चांगले असेच पण यामुळे तुमच्या शरीराला अनेक पोषक घटक देखील मिळतात. चला तर पाहुयात सकाळच्या गडबडीमध्ये सोप्या पद्धतीत व्हेज ग्रील सँडविच कसे बनवतात.
साहित्य:-
ब्रेड ४,कांदा १, शिमला मिरची १, गाजर १, पनीर तुकडे, चीज स्लाइस, बटर,टोमॅटो सॉस,काळी मिरी पावडर, चवीनुसार
कृती:-
सर्वप्रथम व्हेज ग्रील सँडविच बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, गाजर हे सर्व स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या. सर्व भाज्या बारीक कापून झाल्यानंतर पनीर धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर २ ब्रेड घेऊन ब्रेडला तुमच्या आवडीनुसार बटर लावा. बटर लावून झाल्यानंतर त्यावर सर्व बारीक केलेल्या भाज्या, आणि पनीरचे तुकडे ठेवून घ्या. त्यानंतर त्याच्यावर चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर टाका. हे सर्व टाकून झाल्यानंतर वरतून तुम्हाला हवे तेवढे चीझ किसून टाका. नंतर दुसरा ब्रेड घेऊन त्याला बटर लावून ते सोनेरी होईपर्यंत ग्रील करून घ्या. ग्रील झाल्यानंतर वरून पुन्हा तुम्हाला हवे असल्यास चीझ टाकू शकता. हे सँडविच तुम्ही हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता.