
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या कॉर्पोरेट आणि सेवा क्षेत्रात काम सुरळीत सुरू राहावे यासाठी अनेक कंपन्यांमध्ये नाईट शिफ्ट ही गरज बनली आहे. आयटी, बीपीओ, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये हजारो कर्मचारी रात्री काम करतात. वरून पाहता नाईट शिफ्ट आरामदायक वाटत असली, तरी प्रत्यक्षात तिचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः झोपेचा बिघडलेला दिनक्रम आणि जीवनशैलीतील बदल यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे पुरेशी आणि दर्जेदार झोप न मिळणे. रात्री काम केल्यामुळे शरीराची नैसर्गिक झोप-जागरणाची वेळ बदलते. दिवसा झोपून रात्रीच्या झोपेची भरपाई होत नाही, कारण दिवसभरातील प्रकाश, आवाज आणि शरीराची जैविक घड्याळ (Body Clock) यामुळे झोप पूर्ण होत नाही. याचा थेट परिणाम शरीरावर आणि मेंदूवर होतो.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका महत्त्वाच्या संशोधनानुसार, नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना किडनी स्टोनचा धोका अधिक असतो. ‘मायो क्लिनिक प्रोसीडिंग्स’ या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, रात्री काम करणाऱ्यांमध्ये सामान्य लोकांच्या तुलनेत किडनी स्टोन होण्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः तरुण वयातील, कमी शारीरिक हालचाल करणाऱ्या आणि चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब करणाऱ्या लोकांमध्ये हा धोका अधिक दिसून येतो.
संशोधनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, शरीराचे वजन, पाणी पिण्याची सवय, आहार आणि झोपेची पद्धत या सगळ्या गोष्टी किडनी स्टोन तयार होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. नाईट शिफ्ट करणारे अनेक कर्मचारी वेळेवर पाणी पित नाहीत, फास्ट फूडचे सेवन जास्त करतात आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शरीरातील सर्केडियन रिदम बिघडतो.
सर्केडियन रिदम म्हणजे शरीराची नैसर्गिक अंतर्गत घड्याळ प्रणाली. ही प्रणाली ठरवते की कधी झोप यावी, कधी जागे व्हावे आणि कोणते हार्मोन्स कधी तयार व्हावेत. नाईट शिफ्टमुळे हा रिदम विस्कळीत होतो आणि त्यामुळे संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते. याचा परिणाम फक्त किडनीवरच नाही, तर हृदय, मेंदू, पचनसंस्था आणि रोगप्रतिकारशक्तीवरही होतो.
या संशोधनाचे प्रमुख संशोधक, चीनमधील सन यात-सेन विद्यापीठातील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख यिन यांग यांनी सांगितले की, “नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना किडनी स्टोनचा धोका सुमारे १५ टक्क्यांनी अधिक असतो. धूम्रपान, अपुरी झोप, कमी पाणी पिणे आणि वाढलेले वजन हे धोका वाढवणारे घटक आहेत.” या अभ्यासासाठी सुमारे २ लाख २० हजार लोकांचा डेटा १४ वर्षांपर्यंत अभ्यासण्यात आला. दरम्यान, अमेरिकेतील मायो क्लिनिकचे नेफ्रोलॉजी तज्ज्ञ फेलिक्स नॉफ यांनीही नाईट शिफ्टमुळे सर्केडियन रिदम सर्वाधिक प्रभावित होतो, यावर भर दिला आहे. त्यामुळे नाईट शिफ्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे, पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि शक्य तितकी झोपेची शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.