खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराच्या 'या' अवयवांमध्ये वाढू लागतात वेदना
चुकीची जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहीवेळा शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात, तेलकट तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात, तर वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट थर तयार करून रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. पिवळ्या रंगाच्या चिकट थरामुळे हृद्यासह संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. यामुळे हार्ट अटॅक, स्टोक किंवा पक्षाघाताची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेदना होऊ लागतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर छातीमध्ये सतत जळजळ होऊ लागते. छातीमध्ये वाढलेली जळजळ अनेक लोक सामान्य समजतात. मात्र वारंवार ही समस्या उद्भवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. शरीराच्या रक्तप्रवाहावर परिणाम झाल्यानंतर छातीत दुखणे, दडपण जाणवणे किंवा जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते.
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे मान आणि खांद्यांमध्ये वेदना होऊ लागतात. मानेमध्ये जडपणा जाणवणे किंवा खांद्यांमध्ये वेदना होऊ शकते. शरीराच्या या भागांना रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे खांदा आणि मानेमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पायांची आणि हातांची नख पिवळी दिसू लागतात. याशिवाय हटप्यांमध्ये वेदना वाढून अनेक समस्या उद्भवतात. कोलेस्टरॉलमुळे वाढलेला चिकट थर पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागल्यानंतर शरीराच्या रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. या अडथळ्यांमुळे पायांना व्यवस्थित रक्तपूरवठा होत नाही. पायांच्या टाचा आणि बोटांमध्ये वेदना वाढतात.