फोटो सौजन्य - Social Media
जर आई-वडिलांना मधुमेह (डायबिटीज) आहे, तर पुढच्या पिढीला त्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. ही एक आनुवंशिक (genetic) प्रवृत्ती आहे. मात्र, केवळ वारसा म्हणून आपण हात झटकून बसणे योग्य नाही. यावर वेळीच उपाय योजना करून आपण हा आजार टाळू किंवा त्याचा प्रभाव कमी करू शकतो. डॉक्टरांच्या मते, आई किंवा वडील यांना मधुमेह असल्यास पुढच्या पिढीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त धोका असतो आणि दोघांनाही हा आजार असल्यास तो धोका आणखी वाढतो. त्यामुळे सतर्क राहणे आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे हेच यावरचे प्रभावी उत्तर आहे.
सर्वप्रथम आपली आहारशैली सुधारणे आवश्यक आहे. आहारामध्ये शक्यतो गोड पदार्थ, साखरयुक्त पेये, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, आणि प्रोसेस्ड फूड टाळले पाहिजे. त्याऐवजी हिरव्या भाज्या, फळे, भरपूर पाणी, अंडी, डाळी, आणि ऑलिव्ह तेलाचा वापर करावा. दिवसभरात नियमितपणे थोड्याथोड्या अंतराने अन्न घेतल्यास साखरेची पातळी स्थिर राहते. साखरेचा अचानक वाढ-घट टाळण्यासाठी नियमित, संतुलित आहार आवश्यक आहे.
दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे. लठ्ठपणामुळे शरीरातील इन्सुलिन कार्यक्षमतेने काम करत नाही, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे व्यायामाची सवय लावणे गरजेचे आहे. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, जलद चालणे, योग किंवा झुंबा यांसारख्या कसरती केल्यास साखरेवर नियंत्रण मिळते. तिसरे म्हणजे, दरवर्षी शुगर टेस्ट करून घेणे. विशेषतः वयाची २५ वर्षे पार केल्यानंतर, वजन वाढलेले असल्यास किंवा घरच्यांना मधुमेह असल्यास, हे आरोग्य तपासणी अत्यंत गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासणी केल्याने मधुमेहाचे प्रारंभिक लक्षणे ओळखता येतात आणि योग्य वेळी उपचार सुरू करता येतो.
तणावदेखील मधुमेहाचा एक लपलेला कारण असू शकतो. सततचा मानसिक तणाव शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतो आणि त्यामुळे साखरेचे प्रमाण असंतुलित होऊ शकते. म्हणून, ध्यान, योगा आणि सकारात्मक विचार हे ही मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात. म्हणूनच, आई-वडिलांना मधुमेह असला तरी तो आपल्यालाही होणारच असे न मानता आपण आपल्या सवयींमध्ये योग्य बदल करून तो टाळू शकतो. योग्य आहार, व्यायाम, वजनाचे नियंत्रण, आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी’ या गोष्टींच्या सहाय्याने आपण मधुमेहापासून स्वत:चा बचाव करू शकतो.