वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

प्रत्येक गाठ ही कर्करोगाचीच असते असे नाही. संसर्ग किंवा इतर कर्करोग नसलेल्या वैद्यकीय समस्यांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, कोणताही नवीन किंवा सतत जाणवणारा बदल आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय
वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय
Published on: 
Updated on: 

पुरुष अनेकदा आपल्या शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करतात, विशेषतः जेव्हा विषय वैयक्तिक आरोग्याशी संबंधित असतो. वृषणांमध्ये (Testicles) जाणवणारी थोडी सूज, जडपणा किंवा एखादी असामान्य गाठ याकडे तात्पुरती अस्वस्थता समजून दुर्लक्ष केले जाऊ शकते. मात्र, अशा बदलांची वेळीच दखल घेणे महत्त्वाचे आहे, कारण काही वेळा ही लक्षणे वृषणांच्या कर्करोगाची (Testicular Cancer) सुरुवातीची चिन्हे असू शकतात.याविषयी डॉ. किरण तामखणे – कर्करोगतज्ज्ञ, M|O|C कॅन्सर केअर, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

वृषणांचा कर्करोग हा पुरुषांच्या प्रजनन ग्रंथींमध्ये म्हणजेच वृषणांमध्ये विकसित होतो. या ग्रंथी शुक्राणू आणि टेस्टोस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाची निर्मिती करतात. इतर काही कर्करोगांच्या तुलनेत हा कर्करोग तुलनेने दुर्मिळ असला, तरी त्याबाबत जागरूकता असणे आवश्यक आहे. विशेषतः तरुण पुरुषांनी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर १५ ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वाधिक सामान्य कर्करोगांपैकी हा एक आहे. या कर्करोगाबाबत दिलासादायक बाब म्हणजे, वेळीच निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य आहे.

पुरुष स्वतः वृषणांची तपासणी कशी करू शकतात?

आपल्या शरीरात सामान्यतः काय बदल असतात, याची माहिती असणे ही कोणताही असामान्य बदल ओळखण्याची पहिली पायरी आहे. पुरुषांनी नियमितपणे स्वतः वृषणांची तपासणी करावी. शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ करताना किंवा अंघोळीनंतर ही तपासणी करावी. कारण यावेळी अंडकोशाची (Scrotum) त्वचा सैल झालेली असते.

स्वतः तपासणी करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे :

  • निरीक्षण करा (Observe): आरशासमोर उभे राहून अंडकोशामध्ये कोणतीही दृश्यमान सूज, आकारात वाढ किंवा बाह्य स्वरूपात बदल दिसतो का, हे तपासा.

  • प्रत्येक वृषणाची तपासणी करा (Examine Each Testicle): एका हाताच्या अंगठा आणि बोटांच्या साहाय्याने एक वृषण अलगद पकडा. त्याच्या संपूर्ण पृष्ठभागाची हळुवारपणे तपासणी करा. त्यानंतर दुसऱ्या वृषणाचीही अशाच प्रकारे तपासणी करा.

  • असामान्य बदलांकडे लक्ष द्या (Look for Unusual Changes): कोणतीही कठीण गाठ, सूज, आकारातील बदल, आकारमानात वाढ, घट्टपणा किंवा असामान्य जडपणा जाणवतो का, हे तपासा.

  • शरीराची सामान्य रचना समजून घ्या (Understand Normal Anatomy): एका वृषणाचा आकार दुसऱ्यापेक्षा थोडा मोठा असणे किंवा एक वृषण दुसऱ्यापेक्षा खाली लटकलेले असणे हे पूर्णपणे सामान्य आहे. तसेच प्रत्येक वृषणाच्या मागील बाजूस असलेली नळीप्रमाणे मऊ रचना, जिला एपिडिडायमिस (Epididymis) म्हणतात, तीदेखील शरीराचा सामान्य भाग आहे.

  • शरीरातील हे सामान्य बदल समजून घेतल्यास अनावश्यक भीती टाळता येते आणि त्याचबरोबर नव्याने जाणवणारे असामान्य बदल ओळखणेही सोपे होते.

पुरुषांनी दुर्लक्ष करू नयेत अशी धोक्याची लक्षणे:

वृषणांमध्ये वेदना न होता जाणवणारी गाठ किंवा सूज हे सर्वात महत्त्वाच्या धोक्याच्या लक्षणांपैकी एक आहे. याशिवाय वृषणांमध्ये किंवा अंडकोशात सतत वेदना अथवा अस्वस्थता जाणवणे, जडपणा वाटणे, अचानक आकार वाढणे किंवा खालच्या पोटात अथवा जांघेच्या भागात बोथट वेदना होणे हीदेखील काही महत्त्वाची लक्षणे आहेत. काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या स्तनांमध्ये कोमलता जाणवणे किंवा स्तनांचा आकार वाढणे असे बदलही दिसू शकतात.

महत्त्वाची बाब म्हणजे, वेदना होत नसल्या तरी कर्करोगाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. प्रत्येक गाठ ही कर्करोगाचीच असते असे नाही. संसर्ग किंवा इतर कर्करोग नसलेल्या वैद्यकीय समस्यांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, कोणताही नवीन किंवा सतत जाणवणारा बदल आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वृषणांमध्ये अचानक तीव्र वेदना झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.

पुरुषांच्या आरोग्याबाबतचा संकोच दूर करणे गरजेचे:

भारतात लाज, सामाजिक संकोच आणि प्रजनन आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलण्याची अनिच्छा यामुळे अनेक पुरुष वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे; मात्र त्यातून अनावश्यक भीती निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. स्वतः वृषणांची तपासणी करणे हा वैद्यकीय तपासणी किंवा निदानाचा पर्याय नाही. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असलेले बदल वेळीच ओळखण्यास यामुळे मदत होऊ शकते.

संदेश अगदी स्पष्ट आहे:

शरीरात जाणवणाऱ्या असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःहून आजाराचे निदान करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका. स्वतःच्या शरीराची काळजी घेणे ही लाज वाटण्याची गोष्ट नाही, तर आपल्या आरोग्याप्रती जबाबदारीने वागण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.