योनीमार्गात कसे संक्रमण होते
पावसाळा म्हटलं की सर्वाधिक आजार. पण या आजारांसह त्वचेचे आजारही या महिन्यांमध्ये अधिक होताना दिसतात. इतकंच नाही तर त्वचेची काळजी घेण्यासह पावसाळ्यात योनीमार्गाची काळजीही महिलांना अधिक प्रमाणात घ्यावी लागते. कारण पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये योनीमार्गात अधिक प्रमाणात इन्फेक्शन होत असते.
योनीमार्गाच्या संसर्गाचे अनेक प्रकारही आहेत. तुम्हाला याबाबत माहीत आहे का? पावसाळ्यामध्ये योनीमार्गात संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी डॉ. रोहिणी खेरा भट्ट,सल्लागार प्रसुती व स्त्रीरेग तज्ज्ञ,लॅप्रोस्कोपिक सर्जन,मेडिकवर हॉस्पिटल्स,नवी मुंबई यांनी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याआधी योनिमार्गाच्या संसर्गाचे प्रकार जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
बॅक्टेरिअल वेजिनोसिस
व्हजायनल इन्फेक्शन
हा योनीमार्गातील संसर्गाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा संसर्ग जेव्हा होतो तेव्हा तेथील जीवाणूंची संख्या वाढू लागते, त्यामुळे बॅक्टेरियाचे असंतुलन होते. बॅक्टेरियाच्या वेजिनोसिसच्या विकासास अनेक घटक कारणीभूत असू शकतात जसे की सुगंधी उत्पादने किंवा त्रासदायक पदार्थ जे तुमच्या योनीमार्गात जळजळ निर्माण करु शकतात. स्त्रियांना योनिमार्गाच्या आजूबाजूला खाज सुटणे, योनीतून पांढरा किंवा करड्या रंगाचा स्त्राव आणि तीव्र गंध यांसारखी लक्षणे जाणवतात. या नाजूक भागाच्या स्वच्छतेसाठी सुगंधी साबण किंवा रासायनिक उत्पादने वापरणे टाळा,त्याऐवजी स्वच्छ पाण्याचा वापर करा.
हेदेखील वाचा – पावसाळ्यात त्वचा आणि योनीमार्गातील संसर्ग टाळण्यासाठी काय घ्यावी काळजी
यीस्ट इन्फेक्शन
हवेतील आर्द्रता मुळे घाम येऊ शकतो परिणामी योनीच्या क्षेत्राभोवती ओलसरपणा आणि ओलावा निर्माण होतो. कॅन्डिडा अल्बिकन्स नावाची बुरशी ही जास्त इस्ट्रोजेन पातळीमुळे योनीमार्गाच्या संसर्गास जबाबदार ठरते. यामुळे महिलांना यीस्ट संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, कारण यीस्ट संसर्ग हा ओल्या वातावरणात वाढू लागतो.
गर्भधारणा, लैंगिक संभोग, काही औषधे किंवा प्रतिजैविकांचा वापर आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली यासारखे विविध घटक अशा संक्रमणास कारणीभूत ठरतात. यीस्ट संसर्गामुळे योनिमार्गाच्या आसपास खाज सुटणे आणि जळजळ होणे, दाट पांढऱ्या रंगाचा स्त्राव, पुरळ आणि जळजळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. यीस्ट संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगा जसे की सुती अतंर्वस्त्र वापरणे आणि चांगल्या वैयक्तिक स्वच्छतेचा सराव करणे.
ट्रायकोमोनियासिस
योनीमार्गाची काळजी कशी घ्याल
ट्रायकोमोनियासिस हा एक लैंगिक संक्रमणामुळे होणारा रोग आहे आणि प्रामुख्याने परजीवी संसर्गामुळे होतो. एकाधिक सेक्सुअल पार्टनर असणे किंवा लैंगीक संभोगादरम्यान संरक्षण न वापरल्याने तुम्हाला ट्रायकोमोनियासिस संसर्गाचा धोका वाढू शकतो.
महिलांना खाज सुटणे, लघवी करताना वेदना होणे, दुर्गंधी येणे, हिरवट रंगाचा स्त्राव, ओटीपोटाच्या खालच्या बाजूस वेदना होणे आणि खाज येणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. ट्रायकोमोनियासिस सारख्या संसर्गास प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संरक्षण वापरणे आणि लैंगिक संभोग दरम्यान स्वच्छतेसंबंधी नियमांचे पालन करणे.
हेदेखील वाचा – निरोगी आणि समाधानकारक संबंधांसाठी योगाचा अवलंब
मूत्रमार्ग संबंधित संक्रमण
मूत्रमार्गाची लांबी कमी असल्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांना यूटीआय संसर्गाची शक्यता जास्त असते. यूटीआय हा तुमच्या मूत्रसंस्थेतील मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय आणि मूत्रमार्गात होणारा संसर्ग आहे. यामध्ये ओटीपोटाच्या खालच्या भागात दुखणे, सतत लघवी करण्याची इच्छा होणे, लघवी करताना जळजळ होणे आणि लघवीतून रक्त येणे यासारख्या लक्षणांचा समावेश असू शकतो.
ज्या स्त्रिया असुरक्षित लैंगिक संभोग करतात, विशिष्ट प्रकारचे गर्भनिरोधक गोळ्या घेतात आणि आरोग्याच्या स्थितीमुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. रजोनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजेनचे पातळी कमी होते, मूत्रमार्गाचे अस्तर पातळ होते, ज्यामुळे महिलांना युटीआय संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात दीर्घकाळापर्यंत ओले कपडे वापरल्याने जननेंद्रियाच्या क्षेत्रामध्ये जीवाणूंची वाढ होऊ शकते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका टाळण्यासाठी, शौचालयाचा वापर केल्यानंतर जननेंद्रियाचा भाग समोरपासून मागच्या बाजूस स्वच्छ करणे आवश्यक आहे.