
फोटो सौजन्य - Social Media
असं अनेकदा घडतं, प्रवासाला निघाल्यावर रस्ता कधी संपतोय असं वाटतच नाही, पण परत येताना तोच रस्ता अगदी पटकन संपतो! हा रस्त्याचा खेळ नाही, तर आपल्या मेंदूचा कमाल आहे. या घटनेला शास्त्रीय भाषेत ‘रिटर्न ट्रिप इफेक्ट’ म्हटलं जातं. जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी प्रथमच जातो, तेव्हा मेंदू त्या वाटेवरील प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवतो. वळणं, दृश्यं, फलक, ट्रॅफिक सिग्नल. ही सगळी नवी माहिती प्रोसेस करताना मेंदूला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागत असल्यासारखा वाटतो आणि प्रवास लांब भासतो.
याउलट, परतीच्या प्रवासात तोच रस्ता आता परिचित असतो. पुढे काय येणार हे आधीच माहीत असल्याने मेंदूला कमी काम करावं लागतं. शिवाय, घरी परतण्याचा आनंद आणि विश्रांतीची भावना मनात असल्याने प्रवास अधिक सहज, हलका आणि छोटा वाटतो. प्रवास लांब वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे अपेक्षा तुटणे. आपण प्रवास सुरू करताना “लवकर पोहोचू” अशी अवचेतन आशा बाळगतो. पण ट्रॅफिक, वळणे किंवा विलंब झाल्यास ही अपेक्षा तुटते आणि निराशा निर्माण होते. त्यामुळे प्रवास आणखी लांब वाटतो.
तर परतीच्या वेळी आपण बहुतेक वेळा प्रवासाच्या आठवणींमध्ये रमलेले असतो. कुठे गेलो, काय पाहिलं, काय खाल्लं. या आठवणींमध्ये मन गुंतल्याने मेंदूला वेळेची जाणीव कमी होते आणि प्रवास पटकन संपल्यासारखा वाटतो.
याशिवाय, जाताना आपण नवी ठिकाणं पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी किंवा खाण्यासाठी वारंवार ब्रेक घेतो. या छोट्या थांब्यांमुळे प्रवास तुकड्यांत विभागला जातो आणि त्यामुळे तो अधिक लांब भासतो. पण परतताना, आपला एकच उद्देश असतो “लवकर घरी पोहोचायचं.” त्यामुळे ब्रेक कमी घेतले जातात आणि प्रवास अखंड वाटेत पार पडतो, ज्यामुळे तो जलद आणि लहान वाटतो. थोडक्यात सांगायचं झालं, तर जाताना उत्सुकतेचा आणि नव्या अनुभवांचा ओघ मेंदूला धीमं करतो, तर परतताना ओळखीच्या वाटा आणि घराचं आकर्षण प्रवासाला वेग देतं.