फोटो सौजन्य: iStock
नीता परब: राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांवरील कामाचा ताण आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. विशेषतः वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी हे अभ्यास व कामाच्या दबावामुळे अनेकदा मानसिक तणावाखाली येतात. परिणामी, काही प्रकरणांमध्ये आत्महत्येसारख्या टोकाच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) आणि मार्ड (MARD) या संस्थांनी संयुक्तपणे ‘थ्री एम’ उपक्रम राबविण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, या निर्णयाला अद्याप गती न मिळाल्याने हा उपक्रम केवळ कागदावरच राहिल्याची खंत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणी, विकेंडनिमित्त घरी बनवा चविष्ट अन् प्रथिनांनी भरपूर असे ‘सोया कबाब’;
अलीकडेच फलटण येथे एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले, या घटनेमुळे डॉक्टरांवरील कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून उद्भवणारा मानसिक तणाव या समस्या पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत.
निवासी डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ व ‘मार्ड’ एकत्र येऊन सर्वंकष असा ‘थ्री एम’ कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले होते.
या बैठकीला दोन वर्षे उलटून गेली तरीही हा उपक्रम अद्याप कागदावरच आहे. हा उपक्रम राबविल्यास डॉक्टरांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मोलाचे सहकार्य मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आरोग्य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, कुलसचिव डॉ. राजेंद्र बांगल, एमएसएमटीएचे अध्यक्ष डॉ. गोलावर, तसेच केंद्रीय मार्डचे अध्यक्ष, राज्य संयोजक, उपाध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
निवासी डॉक्टरांच्या संघटना मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना येणाऱ्या विविध समस्या कुलगुरूंसमोर मांडल्या होत्या. त्यामध्ये शैक्षणिक समस्येबरोबरच विद्यार्थी आणि अध्यापनाशी संबंधित अडचणी, तसेच कार्यस्थळी होणारा त्रास अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी एक व्यापक योजना तयार करण्यात येणार होती. या माध्यमातून डॉक्टरांमधील कलागुण शोधून त्यांना चालना देत त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार होते.
डॉक्टरांवरील मानसिक तणाव कमी करण्यासाठी मार्ड’ने पुढाकार घेत ‘थ्री एम’ अंतर्गत सायंटिफिक क्लब, कला क्लब आणि छंद क्लब उभारण्याचे ठरवले होते. तसेच डॉक्टरांमधील तणाव कमी करण्यासाठी ‘कोड ब्ल्यू टीम’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या तुकडीत मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे कौशल्य असलेल्या डॉक्टरांचा समावेश करण्यात येणार होता. ही टीम ‘मार्ड’सोबत समन्वय साधून मानसिक तणावाखाली असलेल्या डॉक्टरांना तणावातून बाहेर काढण्यासाठी मदत करणार होती.
राज्यातील पदवी, पदव्युत्तर, निवासी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी ‘मार्ड’कडून मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला माजी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
या उपक्रमाला गती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. महेश तिडके (अध्यक्ष, मार्ड संघटना, जे. जे. रुग्णालय) यांनी सांगितले. त्यांनी म्हटले, “सध्याच्या डॉक्टर संघटनेसोबत चर्चा करून हा उपक्रम अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
डॉ. अभिजित हेलगे (राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र सीनियर डॉक्टर असोसिएशन, माजी राज्य अध्यक्ष, सेंट्रल मार्ड) यांनी सांगितले की या उपक्रमाच्या बैठकीवेळी डॉक्टरांच्या मानसिक तणावावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. हा उपक्रम अंमलात आला, तर सर्व डॉक्टरांना त्याचा फायदा होईल. सध्याच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही यासाठी सहकार्य करू, हे निश्चित.






