फोटो सौजन्य - Social Media
हवाई प्रवास करताना तुम्ही जर सीट नंबरकडे लक्ष दिलंत, तर एक रंजक गोष्ट लक्षात येईल, बहुतांश विमान कंपन्यांमध्ये १३ नंबरची रो असतेच असं नाही! रो १२ नंतर थेट १४ नंबरपासून सीट क्रमांक सुरू होतात. हा काही योगायोग नाही, तर त्यामागे एक मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक कारण दडलं आहे.
पश्चिमी देशांमध्ये १३ हा आकडा अशुभ मानला जातो. या भीतीला “Triskaidekaphobia” असे म्हटले जाते. या अंधश्रद्धेची मुळे ख्रिस्ती परंपरेत आढळतात. ‘द लास्ट सपर’मध्ये १३वा पाहुणा आल्यानंतर येशू ख्रिस्तांना सूलीवर चढवण्यात आले, असे मानले जाते. त्यानंतर १३ हा आकडा दुर्दैवाचे प्रतीक ठरला. नॉर्स (Norse) पुराणकथांमध्येही १३ या आकड्याशी निगडित अशुभ घटना सांगितल्या जातात. त्यामुळे १३ या अंकाबद्दल लोकांच्या मनात भीती आणि नकारात्मकता निर्माण झाली आहे.
विमानप्रवास हा अनेकांसाठी तणावाचा अनुभव असतो. एअरलाइन्स कंपन्या आपल्या प्रवाशांना प्रवासादरम्यान शांत आणि आरामदायी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर एखादा नंबर प्रवाशाच्या मनात भीती निर्माण करू शकतो, तर त्या सीटचा नंबर काढून टाकणेच कंपन्यांना योग्य वाटते. हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय धोरण आहे.
त्याचबरोबर, हा निर्णय व्यवसायिक दृष्ट्याही फायदेशीर आहे. कारण १३ नंबरच्या सीटवर बसण्यास प्रवासी नाखूष राहू शकतात, ज्यामुळे ती सीट रिकामी राहण्याचा धोका असतो. त्यामुळे कंपन्या तो नंबरच वगळतात. विशेषतः आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये, जिथे प्रवासी वेगवेगळ्या संस्कृतीतून येतात, तेथे ही काळजी अधिक आवश्यक ठरते.
फक्त १३च नाही, तर काही देशांमध्ये १७ नंबरलाही अशुभ मानले जाते. उदाहरणार्थ, इटली आणि ब्राझीलमध्ये रोमन भाषेत १७ लिहिलं जातं ते “मी माझं आयुष्य संपवलं आहे” असा अर्थ देतं. त्यामुळे ते लोक १७ ला अपशकुन मानतात. अशा रीतीने, आकड्यांशी निगडित श्रद्धा आणि भीतींनीही विमानांच्या सीट डिझाइनवर परिणाम केला आहे.